पेरमिली वनपरिक्षेत्र अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अहेरी – मिलिंद खोंड
वनपरिक्षेत्र पेरमिली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद आनंदराव जेनेकर, वय ३८ वर्षे यांना ५,००,०००/- रूपयांची लाच स्विकारन्यावरून अॅन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोलीच्या पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तकारदार यास मौजा तुमरगुंडा ते कासमपल्ली रस्त्याचे कामावरील पकडलेली ट्रॅक्टर सोडण्याकरीता व ७२ लाख रूपयाची फाईन कमी करून ५ लाख रूपयापर्यंत फाईन करण्याकरीता वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिक्षेत्र पेरमिली ता. अहेरी जि. गडचिरोली यांनी १०,००,०००/- रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिका-यांशी संपर्क साधुन तकारी दिली.
पोलीस उपअधिक्षक, श्रीमती अनामिका मिर्झापूरे यांचे पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, ला.प्र. वि. गडचिरोली यांनी तकारदाराने दिलेल्या तकारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान श्री प्रमोद आनंदराव जेनेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी पेरमिली ता. अहेरी यांनी तक्रारदार यास तुमरगुंडा ते कासमपल्ली रस्त्याचे कामावरील पकडलेली ट्रॅक्टर सोडण्याकरीता व ७२ लाख रूपयाची फाईन कमी करून ५ लाख रूपयापर्यंत फाईन करण्याकरीता १०,००,०००/- रुपये लाचेची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केली व आपले लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता वाम व भ्रष्ट मागनि तडजोडीअंती ५,००,०००/- रुपये लाच रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने त्यांना रंगेहात पकडले.
तसेच पेरमिली येथील आलोसे राहत असलेल्या शासकीय निवासस्थानाची घरझडती घेतली असता ८५,०००/- रूपये रोख रक्कम मिळुन आली असून ती जप्त करण्यात आली आहे. प्रमोद आनंदराव जेनेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी पेरमिली यांचेविरूध्द उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अॅन्टी करप्शन ब्युरो नागपुर, श्री सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूरे, अॅन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली, पोलीस निरीक्षक, श्री. श्रीधर भोसले, सफौ सुनिल पेदट्टीवार, नापोशि किशोर जौजारकर, पोशि संदीप घोरमोडे, संदीप उडाण व चापोहवा नरेश कस्तुरवार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.