सुनील सावल यांना प्रयोगशील शेतकरी पुरस्कार प्रदान….
नागपूर – शरद नागदेवे
नागपूर -फळ, भाज्या, धान्यांची विविधता असलेला आपला देश या पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्यात, त्याचे मार्केटींग करण्यात आपण कमी पडतो आहे. आताशा नवनवीन तंत्र विकसीत होत असताना सुनील यावल यांच्यासारख्या प्रयोगशील शेतकत्यांची गरज असून त्यामुळे देश अधिक आर्थिक संपन्न होईल, असे प्रतिपादन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक, वनबलप्रमुख डॉ. शैलेश टेंभुर्णीकर यांनी केले.
हरितक्रांतीचे प्रणेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकयांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक फाउंडेशन व वनराई फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने प्रयोगशील शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्याचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. २०२४ चा हा पुरस्कार विदर्भातील प्रयोगशील शेतकरी सुनील सावल यांना राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक, वनबलप्रमुख डॉ. शैलेश टेंभुर्णीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते.
शंकरनगर चौकातील राष्ट्रभाषा संकुलातील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते तर मंचावर डॉ. शैलेश टेंभुर्णीकर, सत्कारमूर्ती सुनील सावल, वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अनंत घारड व अजय पाटील, वनराई फाउंडेशनचे सचिव नीलेश खांडेकर यांची उपस्थिती होती.
डॉ. शैलेश टेंभुर्णीकर यांनी सुरुवातीला वसंतराव नाईक यांच्या स्मृतींना अभिवादन केले. शेतीकरीता वनविभाग अनेक योजना राबवत आहेत असे सांगताना ते म्हणाले, वनविभाग शेतीशी निगडीत असून वनांतील सुपीक मातीमुळे शेतीची उत्पादन क्षमता वाढते.
वनांमध्ये जे वृक्षराजी संवर्धनाचे काम केले जाते तेच काम सुनील सावल करीत आहेत. एकाच प्रकारच्या जमिनीमध्ये चार प्रकारचे पीक घेतले तर उत्पादन क्षमता वाढेल आणि उत्पन्न वाढेल. सुगंधी व औषधी गवतांमध्ये खूप क्षमता असून शेतक-यांनी त्याचे उत्पादन घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहत डॉ. गिरीश गांधी यांनी पडीक जमिनीच्या समस्येचा मुद्दा मांडला. सुनील सावल यांनी अशा पडीक जमिनीवर धाडसी प्रयोग करीत या ठिकाणी चांगले उत्पादन घेता येऊ शकतो, हे दाखवून दिले, असे ते म्हणाले. सुनील सावल यांनी पुरस्कारासाठी सर्वांचे आभार मानले.
प्रास्ताविकातून अनंतराव घारड यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्यावर प्रकाश टाकली. निलेश खांडेकर यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. सुरेख सूत्रसंचालन प्रगती पाटील यांनी केले तर अजय पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम काळे, रमेश बोरकुटे, अतुल दुरुगकर, नरेंद्र मोहोता, नितीन जतकर, अरविंद पाटील, शुभंकर पाटील, रेखा घिया, राजू चव्हाण, आत्माराम नाईक, जयश्री राठोड, स्नेह कांदे, निता मस्के, ममता जयस्वाल यांचे सहकार्य लाभले.
शेती व वाणिकीला चांगले भविष्य
शेती आणि वाणिकी या दोन्ही क्षेत्रांसाठी येणारा काळ चांगला असून त्यामुळे वातावरणातील बदल थोपवता येतील, असे सांगताना डॉ. शैलेश टेंभुर्णीकर यांनी सेंद्रीय शेतीवर भर देण्याचा सल्ला दिला. सेंद्रीय शेतीमध्ये खूप क्षमता असून सेंद्रीयचा टॅग लागलाची उत्पादनाचा चांगली किंमत मिळते, असे ते म्हणाले.