हुंडीचिठ्ठी व्यापारी रंगनाथ चांडक अडचणीत
अकोला, दि. 13: हुंडीचिठ्ठित ठेवीसाठी पाच लक्ष रुपयांची रक्कम घेऊन तिचे व्याज आणि मुद्दल देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या अमरावतीच्या व्यापाऱ्याला अकोला ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चांगलाच दणका देणारा निर्वाळा दिल्याने हुंडी चिट्ठी व्यवसायात खळबळ माजली आहे. या निर्वाळ्याने ठेवीदारांना आपल्या रकमेचे संरक्षण होते असा विश्वास निर्माण झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अकोला शहरातील आळशी प्लॉट स्थित विधी स्वप्निल शहा यांनी रंगनाथ एस चांडक, राहणार धनराज लेन, अमरावती यांना हुंडीचिट्ठीच्या ठेवी पोटी पाच लक्ष रुपयाची रक्कम दिली होती. सदर रक्कम दिल्यानंतर त्या रकमेपोटी धनादेश देऊन आपल्या प्रतिष्ठाणाच्या लेटर पॅडवर शाह यांना हक्क ठेव पावती सुद्धा दिली होती. ज्यावर दरमहा एक रुपया वीस पैसे दराने व्याज देण्याचे ठरले होते.
सदर व्यवहार झाल्यानंतर चांडक याने विधी शाह यांना रकमेचे व्याज देणे थांबवले आणि मुद्दल रक्कम देण्यासाठी नकार दिला. चांडक याचा हा गैरव्यवहार विधी शाह यांनी अॅड . सुमित महेश बजाज यांच्यामार्फत ग्राहक तक्रार निवारण आयोग अकोला येथे खटल्याद्वारे दाखल केला. यामध्ये तक्रारकर्त्या विधी शाह ह्या ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत संरक्षण क्षेत्रामध्ये येत असल्याने त्यांना आयोगाने दिलासा देत.
चांडक यांनी त्यांच्या ठेवीची रक्कम 5,00,000 रुपये देय तारखेपासून दसादशे 8 टक्के व्याजदराने प्रत्यक्ष रक्कमदायेगी पर्यंत व्याजासहित द्यावी तसेच शारीरिक मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून 5000 रुपये व किरकोळ खर्च म्हणून 3000 रुपये असे निकाल लागल्यापासून 45 दिवसाच्या आत अंमलबजावणीत आणण्याचे आदेश अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग एस. एम. उंटवाले आणि सदस्य सुहास आळशी यांनी बजाविले आहेत.