Sunday, December 29, 2024
Homeराज्यस्पर्धा आयोजक रंगतपस्वी प्रकाश देसाई आणि परीक्षक ज्येष्ठ अभिनेते, नाटककार अशोक समेळ...

स्पर्धा आयोजक रंगतपस्वी प्रकाश देसाई आणि परीक्षक ज्येष्ठ अभिनेते, नाटककार अशोक समेळ…

गणेश तळेकर

रंगतपस्वी प्रकाश देसाई आयोजित तरूण रंगकर्मींचा कुंभमेळा

प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान या एकांकिका स्पर्धेत रंगकर्मीनी जो उत्साह दाखवला तो अवर्णनीय आहेच पण यामागे जे कर्तृत्व उभं आहे ते उद्योजक प्रकाश देसाई यांचं. त्यामुळेच हा तरूण कलाकारांचा कुंभमेळा, किंवा महायज्ञ म्हणूया, इथं यशस्वीपणे संपन्न झाला’, असे गौरवोद्गार या स्पर्धेचे परीक्षक, ज्येष्ठ अभिनेते, नाटककार, निर्माते अशोक समेळ यांनी काढले.

गेली ४५-५० वर्षं ते विविध नाट्यस्पर्धांना परीक्षक या नात्यानं कार्यरत आहेत. ते पुढे म्हणाले,’प्रकाश देसाईंसारखं सांस्कृतिक, सामाजिक भान असलेलं व्यक्तिमत्व आणि रंगभूमीवर नितांत, निर्व्याज प्रेम, आस्था असणारं नेतृत्व असेल तर प्रत्येक गावात नाट्यकला फुलेल, बहरेल, कायम स्वरूपी रूजेल. मला परीक्षक म्हणून हे वैभव पाहता आलं. एक नाटक जगणारा विद्यार्थी म्हणून श्री. प्रकाश देसाई, त्यांचे सहकारी वेत्रवात गुरव, सचिन मोरे आणि इतर सहकारी यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे’.

थंडीचा कडाका असूनही सायंकाळी ७.३० वाजल्यापासून ते पहाटे २.३० वाजेपर्यंत स्पर्धकांच्या उत्साहाबरोबरच प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी अखेरपर्यंत होती. हा उत्साह अवर्णनीय. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रकमेची पारितोषिकं होती. शिवाय रंगकर्मींच्या भोजनासह इतर आवश्यक गोष्टींची व्यवस्था आयोजकांनी दक्षतेने केली होती. एकांकिका स्पर्धेचं हे बारावं वर्ष. प्रत्येक वर्षी रंगकर्मींचा उत्साह हा वाढता आहे, हे लक्षणीय आहे.

अशोक समेळ, डाॅ. मोने आणि रवींद्र घोडके यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी एकमतानं दिलेला स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे :
प्रथम पुरस्कार : रू.७५०००/- आणि स्मृतिचिन्ह : ब्रह्मपुरा – एम् डी काॅलेज
द्वितीय पुरस्कार : रू.५००००/- आणि स्मृतिचिन्ह : चिनाब से रावी तक – क्राऊड नाट्यसंस्था
तृतीय पुरस्कार : रू.२५०००/- आणि स्मृतिचिन्ह : कुक्कुर – ज्ञानसाधना काॅलेज
लक्षवेधी : रू.१५०००/- आणि स्मृतिचिन्ह : गुडबाय किस – जिराफ थिएटर्स
रायगड जिल्हा सर्वोत्तम : वेदना सातारकर हाजीर हो – सी के टी काॅलेज, पनवेल शिवाय, सुधागड तालुक्यातील खेडेगावांमधील शेकडो वर्षे जुन्या हौशी नाट्यसंस्थांचाही यावेळी आवर्जून गौरव करण्यात आला.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: