Sunday, December 22, 2024
Homeराजकीयभारसाखळे झोपले…गावंडे चक्रावले…आणि मतदार भांबावले…

भारसाखळे झोपले…गावंडे चक्रावले…आणि मतदार भांबावले…

आकोट – संजय आठवले

आकोट मतदार संघात प्रचारादरम्यान झालेल्या एका सभेतच झोपल्याने आमदार प्रकाश भासाखळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रकाश झोतात आले असून हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे स्वतःला तरणेताठे भासवून एकदम फिट असल्याचा आव आणत असले तरी भारसाखळे वृद्धत्वाने थकले असून त्यांनी आता विश्राम करायला हवा अशी चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. सोबतच वय साथ देत नसतांनाही ते उगाच शरीराला दगदग का देत आहेत? याची पृच्छाही होत आहे.

आकोट मतदार संघात झाडून सारे उमेदवार प्रचार कार्यात व्यस्त झालेले आहेत. त्यात एकटे भारसाखळे वगळता सर्व उमेदवार साठीच्या आतील असल्याने पायाला भिंगरी बांधल्यागत फिरत आहेत. शारीरिक फिटनेस मुळे या लोकांमध्ये ही सगळी दगदग सहन करण्याची क्षमता आहे. परंतु सत्तरीच्या वर असलेल्या भारसाखळे यांना मात्र निसर्ग नियमानुसार शारीरिक श्रम सोसत नसल्याचे दिसत आहे. परिणामी त्यांचे या समस्येची मतदारसंघात मोठी चर्चा होत आहे. ही चर्चा होणेकरिता कारणही तसेच आहे.

झाले असे कि प्रचारादरम्यान फिरताना तेल्हारा तालुक्यातील एका गावात भारसाखळे यांची कॉर्नर मीटिंग होणार होती. त्यावेळी भाजपाचे राज्य उपाध्यक्ष अनिल गावंडे हे सुद्धा भासाकळे यांचे सोबत होते. मीटिंग सुरू झाली. गावंडे बोलण्याकरिता उभे झाले. त्यांचे भाषण रंगात आले. परंतु शारीरिक ताण असह्य होऊन दुसरीकडे भारसाखळे मात्र आपल्या आसनावर बसल्या जागीच निद्राधीन झाले. याबाबत उपस्थितांमध्ये कुदबुज सुरू झाली. ती ध्यानात येतात गावंडे यांनी काय झाले म्हणून भारसाखळे यांच्याकडे कटाक्ष टाकला. त्यावेळी भारसाखळे चक्र डाराडून झोपी गेल्याचे त्यांना कळले.

ह्या प्रकाराने गावंडे जाम चक्रावले. ओठांवरील खट्याळ हसू आणि डोळ्यातील मिश्किल भाव रोखणे त्यांनाही कठीण गेले. परंतु तेव्हा उपस्थितांमधील कुणीतरी आपल्या मोबाईल मध्ये नेमका तो क्षण टिपला. आणि क्षणार्धात हा झोपेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर अल्पावधीतच तो फोटो हजारो मोबाईल्स वर झळकला. सोबतच सुरू झाले भारसाखळे यांच्या शरीर स्वास्थ्याचे गुऱ्हाळ. आकोटची उमेदवारी बहाल होण्यापूर्वी भारसाखळे चक्क फडणवीस यांच्यात जाहीर सभेतही असेच बसल्याबसल्या झोपले होते. या आठवणीलाही उजाळा दिला जाऊ लागला.

वास्तविक अतिश्रमाने जरासा आराम मिळताच झोप येणे हे निसर्ग नियमानुसार स्वभाविक आहे. त्यामुळे हा प्रकार काही नवखा नाही. परंतु शरीर स्वास्थ्याबाबतचे निसर्ग नियम मानण्यास भारसाखळे तयारच नाहीत. आपल्या साऱ्या व्याधी, त्यावरिल औषधोपचार लपवून ते आपण अगदी फिट असल्याचे लोकांना कायम भासवीत असतात. परंतु वास्तव काही केल्या लपत नसते. त्यामुळेच आकोट मतदार संघाची तिबार उमेदवारी मागण्यास ते गेले असता, केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी भारसाखळे यांना सबुरीचा सल्ला दिला होता. आपले वय झाल्याने आपण आता विश्राम करावा अशी सूचनाही त्यांनी भारसाखळे यांना केली होती. परंतु “अभी तो मै जवान हु” असा अट्टाहास भारसाखळे यांनी केल्याने भाजप नेते, कार्यकर्ते आणि मतदार यांचा विरोध झुगारून फडणवीस यांनी त्यांना उमेदवारी दिली.

परंतु आता त्यांचा हा अट्टाहासच त्यांच्या अंगलट येत आहे. आपण नवतरुण असल्याचे भासवीत असल्याने ते तसे नाहीत हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळेच ते सभागृहात गेल्यावरही असेच झोपी जातील का असा प्रश्न मतदारांचे ओठावर रुंजी घालत आहे. परिणामी त्यांच्या शरीर अस्वास्थ्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. मजेदार म्हणजे या चर्चेमुळेच भाजप नेते अनिल गावंडे यांचेसह भारसाखळे यांचे अन्य प्रचारकही धास्तावले आहेत.

त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भारसाखळे यांचे सारे प्रतिस्पर्धी साठीच्या आतील आहेत. धडधाकट आहेत. उच्च शिक्षित आहेत. प्रशासकीय कामात तरबेज आहेत, विशेष म्हणजे सारे स्थानिक आहेत. एकूणच आमदार होण्याकरिता लागणाऱ्या सर्व पात्रतांची पूर्तता करणारे आहेत. असे असताना आकोट मतदार संघात पार्सल असणे, अल्पशिक्षित असणे, शारीरिक दृष्ट्या अक्षम असणे, स्वपक्षातच प्रचंड विरोध असणे ह्या नकारात्मक बाबींचाच भरणा भक्कम असलेल्या भारसाखळे यांचे प्रचाराने आपणही गोत्यात येवू याचे भान अनिल गावंडे आणि अन्य प्रचारक यांना आलेले आहे. परंतु आपण वृद्ध झालेलो आहोत. त्याने आपली प्रकृती नीट राहत नाही. याचे भान भारसाखळे यांना मात्र आलेलेच नाही. त्यामुळे हट्टी असलेल्या प्रकाश भारसाखळे यांचे आजारपण आणि वृद्धत्व याचे भान ठेवून आता मतदारांनीच त्यांना दर्यापूर येथील विश्रामगृहात पाठवावे अशी चर्चा जोर धरु लागली आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: