आकोट – संजय आठवले
एका शासकीय अधिकारी विधवा महिले संदर्भात वृत्त प्रकाशित करणे, तिचा पाठलाग करणे, तिच्याशी लगट करणे, तिला धमक्या देणे, एकटीला खोलीवर भेटीस बोलाविणे या प्रकारांनी जेरीस आलेल्या त्या अधिकारी महिलेच्या तक्रारीवरून एका कथित पत्रकारावर आकोट शहर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्या संदर्भात या पत्रकाराने आकोट न्यायालयात अटकपूर्व जामीनाकरिता याचिका दाखल केली असून येत्या २ नोव्हेंबर रोजी त्यावर सुनावणी ठेवण्यात आली आहे.
धनादेश अनादरन प्रकरणात दोन वर्षे करावास, दंड आणि धनादेशातील रकमेच्या दुप्पट रक्कम देणे संदर्भात आकोट न्यायालयाने नुकताच फैसला दिला आहे. या फैसल्याची शाई वाळते न वाळते तोच रविराज युवराज मोरे हा आता सरकारी अधिकारी महिलेच्या विनयभंग प्रकरणात अडकला आहे.
या संदर्भात आकोट पोलीस त्याचा शोध घेत असल्याने हा इसम फरार असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर ह्या जातीने करीत आहेत. त्याला सर्वच बाबतीत सहकार्य करणारे पत्रकार, झेरॉक्स सेंटर वाले यांचेवर पोलिसांनी पाळत ठेवलेली आहे. त्यामुळे या सहकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
या प्रकरणाची हकीगत अशी आहे कि, महिला वर्गाशी संबंधित एका शासकीय कार्यालयात पर्यवेक्षिका या पदावर एक महिला कार्यरत आहे. गत अनेक महिन्यांपासून कथित पत्रकार रविराज मोरे हा या महिलेवर नजर ठेवून आहे. त्याने अनेक वार या महिलेबाबत छूटपूट बातम्या प्रकाशित केल्या आहेत.
त्यांना या महिलेने दाद न दिल्याने त्याने या महिलेला फोन करणे, भेट घेणे सुरू केले. त्या प्रत्येक वेळी “तुम्ही माझे ऐकले नाही तर तुम्हाला सस्पेंड करीन. बदली करीन. लाच प्रतिबंधक विभागाकडून अटक करविन” अशा धमक्या त्याने या महिलेला दिल्या.
या प्रकाराने वैतागलेल्या या महिलेने यासंदर्भात तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी विनय कटियार जिल्हा परिषद अकोला यांचे कडे तक्रारी केल्या. परंतु त्यावर काहीही झाले नाही. त्याने मनोबल उंचावलेल्या रवी मोरे याने या महिलेस त्रास देणे सुरूच ठेवले.
ही महिला आकोट बस स्थानकावरून तिचे कार्यालयात जात असताना हा तिचा पाठलाग करायचा. एके दिवशी त्याने तिला रस्त्यात अडवून बळजोरीने तिचा हात पकडण्याचा प्रयास केला. आणि “तुम्ही माझ्याशी बोलत का नाही?” अशी पृच्छा केली. त्यावेळी त्याचा हात झिडकारून ही महिला तेथून निघून गेली.
त्यानंतर त्याने या महिलेच्या सहकारी महिला कर्मचाऱ्यांना फोन करून “तुमचे मॅडमला मला भेटायला सांगा. नाहीतर मी त्यांचे विरोधात बातम्या देईन आणि तुमची बदली करीन” अशा धमक्या दिल्या. त्या भीतीने सदर महिलेने रवी मोरे ह्याला दि.२४.९.२०२३ रोजी फोन केला.
त्यावेळी त्याने या महिलेला तुकाराम चौक अकोला येथे भेटण्यास सांगितले. त्यावर ही महिला आपल्या वाहन चालकासह तेथे गेली. तिथे त्याने म्हटले कि, “तुमचे कार्यालयातील लिपिक चंदन याचे बद्दल मी म्हणेन त्याला होकार द्या” परंतु असे करण्यास नकार देऊन ती महिला तेथून निघून गेली.
त्यानंतर पुन्हा दि. ६.१०.२३ रोजी रवी मोरे याने या महिलेस फोन केला. आणि म्हटले कि, “तुम्ही मला फोन का करीत नाही? का भेटत नाही? भेटायला येताना एकटी न येता वाहन चालकाला का आणता? माझी फोर बंगला अकोला येथे भाड्याची रूम आहे.”
ह्यावर त्या महिलेने “तुम्हाला कार्यालयीन काम असल्यास माझे कार्यालयात भेटा” असे उत्तर दिले आणि ती तिथून निघून गेली. या सर्व घटनांची कैफियत या महिलेने आकोट शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी भादवी कलम ३५४, ३५४ डी, ५०६ अन्वये रविराज युवराज मोरे याचेवर गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर सदर इसम अद्यापही फरार आहे. परंतु याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळणेकरिता त्याने आकोट न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी ३० ऑक्टोबर २३ रोजी होती. परंतु सदर महिलेस ही नोटीस न मिळाल्याने न्यायालयाने याप्रकरणी २ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे. सदर महिलेच्या बयानानंतर याप्रकरणी फैसला देण्यात येणार आहे.