आकोट – संजय आठवले
मुर्तीजापुर तालुक्यातील मौजे भगोरा येथील गट क्रमांक ९६ मधील अवैध उत्खननापोटी झालेल्या दंडाचा भरणा करण्याऐवजी उत्खननकर्ता दीपक अव्वलवार यांनी मूर्तिजापूर येथील एका बड्या भाऊच्या सल्ल्याने आपण केलेल्या अवैध उत्खननाच्या पाऊलखुणा मिटविण्याकरिता उत्खनन केल्याने झालेला भला मोठा खड्डा बुजविण्याचा प्रताप सुरू केला आहे. याकरिताही दुसऱ्या ठिकाणी ऊत्खनन केले जात असल्याने उत्खननकर्ता स्वतः करिता दुसऱ्या अपराधाचा खड्डा तयार करीत असून त्याद्वारे शासनाचे करोडो रुपयांचे आणि स्वतः अपराधी बनण्याचे नुकसान करीत आहे. त्यामुळे येत्या वर्षात त्या भाऊंचा सल्ला शासन व अव्वलवार या दोघांनाही अडचणीत आणणार असल्याचे दिसत आहे.
वाचकास स्मरतच असेल की, मूर्तिजापुर तालुक्यातील मौजे भगोरा येथील गट क्रमांक ९६ मध्ये दीपक अव्वलवार यांनी १२११५.५९ ब्रास अवैध उत्खनन केले. त्यापोटी महसूल विभागाने त्यांना १७ कोटी ९० लक्ष ९ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे .आता त्याच्या वसुली संदर्भात पत्रोपचाराखेरीज महसूल विभाग अन्य कोणतीच ठोस कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे. त्यानंतर आता शासनाकडे दंडाचा भरणा करण्याऐवजी अव्वलवार यांनी एका राजकीय भाऊंचे देव्हारे पूजनाचे काम केले आहे. त्याचबरोबर या भाऊच्याच सल्ल्याने त्यांनी शासनास चकविण्याचा प्रकार सुरू केला आहे. या भाऊंनी अव्वलवारांना अवैध उत्खननाचे पुरावे मिटविण्याचा सल्ला दिला असल्याने त्यांनी अवैध उत्खननाचा खड्डा बुजविणे सुरू केले आहे. गट क्रमांक ९६ मध्ये असलेला हा अवैध उत्पन्नाचा खड्डा बुजविणेकरिता गट क्रमांक ९८ मधील गौण खनिज आणण्यात येत असल्याची जोरदार चर्चा आहे.
महत्त्वाचे म्हणजे गट क्रमांक ९६ मधील खड्ड्यातून तब्बल १२,११५.५९ ब्रास उत्खनन झाले आहे. त्यामुळे तो खड्डा भरण्याकरिता तितकेच गौण खनिज लागणार आहे. माहिती आहे की, अव्वलवार यांचे गट क्रमांक ९८ या खदानीतून हे गौणखनिज आणले जात आहे. त्यामुळे या ठिकाणीही असाच खड्डा केला जाणार आहे. परंतू त्याला लागणारी शासकीय परवानगी काढलेली नाही. अर्थात या गट क्रमांक ९६ मध्ये अवैध उत्खनन केले जात आहे. म्हणजेच या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या अवैध उत्खननासह पुरावे मिटविण्याचा अपराध केला जात आहे. त्यामुळे “भाऊंचा हा सल्ला अघोरी मांत्रिकाचा सल्ला ठरणार आहे”. ज्याप्रमाणे एखादा दुर्धर रुग्ण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी अघोरी मांत्रिकाकडे जातो. तो मांत्रिक त्याला बरे होण्याकरिता एखादा बळी देण्यास सांगतो. तो रुग्ण बळी देतो. पण भलताच इलाज केल्याने आपला रोगही बळावून बसतो. अशी गत या सल्ल्याने होणार आहे
या सल्ल्यानुसारच अवलवार यांनी गट क्रमांक ९६ मधील खड्डा काही प्रमाणात बूजविला आहे. त्यानंतर तो बूजविला असल्याच्या खुणा दिसावयास नको, म्हणून त्यांनी या ठिकाणी तुषार सिंचनाद्वारे पाणी देणे सुरू केले आहे.
या ठिकाणी उल्लेखनीय आहे की, आकोट तालुक्यातील मौजे गाजीपुर येथील गट क्रमांक २७ मध्ये झालेल्या अवैध उत्खननाचे पुरावे मिटविण्याकरिता उत्खननकर्त्याने असाच भराव टाकून त्यावर हाच पाणी प्रयोग केला होता. मात्र महा व्हाईस न्यूजने या प्रकरणात पाठपुरावा करून जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास आकोट महसूल विभागास भाग पाडले होते. त्यानुसार भूविज्ञान व खणीकर्म संचालनालय नागपूर यांनी त्याठिकाणी मोजमाप घेतलेले आहे.
नेमका तोच प्रयोग मूर्तिजापुर तालुक्यातील मौजे भगोरा येथील गट क्रमांक ९६ मध्ये होत आहे. त्यामुळे या प्रयोगाचे संक्रमण संपूर्ण जिल्हाभरात झाल्याचे दिसत आहे. हा सारा प्रकार लोक उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याने तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनाही या सार्यांची माहिती आहे. परंतु त्यांच्याकडून या प्रकारांना रोखण्याचे ठोस प्रयत्न होताना मात्र दिसत नाहीत. हे काहीही असले तरी या अवैध उत्खननाचे मोजमाप होऊन त्याचा रितसर पंचनामा व अहवाल तयार केला गेलेला आहे. त्यानुसार उत्खननकर्त्याला दंडही ठोठावलेला आहे त्यामुळे या ठिकाणी या अवैध उत्खननाचा खड्डा पूर्ण बुजविला तरीही उत्खननकर्त्याची या दंडातून मात्र सुटका होणार नाही. हे ही तितकेच खरे आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्यांना “त्या भाऊंनी” असे अघोरी सल्ले देऊन अधिकच अडचणीत आणण्याऐवजी “कायदे मे रहोगे तो फायदेमे रहोगे” हा सल्ला देणे अधिक उचित आहे. त्याद्वारे अशा अवैध कृत्यांना आळा बसून शासनाचेही नुकसान होणार नाही.