Monday, December 23, 2024
Homeराज्यडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३८ वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न..!

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३८ वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न..!

सर्वार्थाने संपन्न भारत देश घडविण्यासाठी कृषी क्षेत्रावर मोठी जबाबदारी :- राज्यपाल रमेश बैस

अकोला – संतोषकुमार गवई

भारत देशाला जागतिक महासत्ताक बनवण्याकडे अग्रसित होत असताना कृषीप्रधान संस्कृती व सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्राची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायाने कृषी पदवीधरांवर अधिक उमेद असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय रमेश बैस यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 38 व्या दीक्षांत समारोहात अध्यक्षीय भाषण करताना दूरदृष्टी प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित पदविकांक्षींसोबत संवाद साधला. आपल्या अतिशय मार्मिक संबोधनात त्यांनी देशातील कृषी विद्यापीठे आणि कृषी क्षेत्राचे भवितव्यावर सखोल प्रकाश टाकला व शाश्वत ग्रामविकासासाठी कृषी विद्यापीठानी मध्यवर्ती भूमिका बजवावी असे आवाहनही याप्रसंगी केले.

राज्यपाल बैस पुढे म्हणाले, काही वर्षांपुर्वी भारत अन्नधान्याच्या क्षेत्रात जगावर विसंबून होता. तेंव्हा निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य आयात व्हायचे. आता परिस्थिती बदलली. हरीतक्रांतीने आपण स्वयंपूर्ण झालो आहोत. मागील १० वर्षात शेतीमध्ये चढउतार येत आहेत. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य, ही दोन्ही सरकारे विविध योजनाही राबवत आहेत. देशात नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले जात आहे. काही शेतकरी किटकनाशकांचा वापर कमी प्रमाणात करू लागले.

सौरऊर्जेचा वापर सुरु झाला. शेती क्षेत्रात ड्रोनचा वापर होतो आहे. फलोत्पादनाला प्रोत्साहन मिळते आहे. फूल शेतीला आपल्याकडे मोठा वाव आहे. पशूधन, जलक्षेत्राशी निगडीत व्यवसायात संधी आहेत. मत्स्य उत्पादनात भारत आता जगात तिसऱ्या स्‍थानावर पोचण्याची गौरवास्पद कामगिरी करू शकला. मातीचा पोत सुधारण्याकडे लक्ष द्यावे लागेल.

चांगले बी-बियाणे, वाण शोधावे लागतील. पाण्याचा काटकसरीने वापर, जलपुनर्भरणाच्या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे, असे राज्यपालांनी सांगितले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिक्षण, विस्तार, संशोधनासह विविध क्षेत्रात चालवलेल्या कामांविषयी देखील राज्यपालांनी कौतुक केले.

कृषी क्षेत्रात रोजगार- स्वयंरोजगारसह राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध सेवेच्या संधी उपलब्ध असून कृषी विषयक शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या पदवीधरांमधून गावोगावी कृषी उद्योजक निर्माण होत शेती क्षेत्राला खऱ्या अर्थाने सर्वोत्तम दर्जा देण्याचे महत्तम कार्य साकारण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या “मॉडेल व्हिलेज” उपक्रमाची त्यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रशंसा केली व अशा पद्धतीने राज्यात मोठ्या संख्येने आदर्श गावांची निर्मिती साध्य होईल असा आशावादही राज्यपाल महोदयांनी व्यक्त केला.

तर आजच्या शेतीसमोर वातावरणातील बदलाचे प्रमुख संकट आहे. कृषी विद्यापीठातून पदवीधर घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी वातावरणीय बदलाच्या संकटाचे संधीमध्ये रूपांतर करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. दीक्षान्त सोहळ्यात पदवी घेतलेल्यांचे काम आता संपलेले नसून खऱ्या अर्थाने येथून पुढे सुरु झाले असून या देशात स्वामिनाथन सारख्या शास्त्रज्ञाने हरीतक्रांती घडवून अन्नधान्यात स्वयंपूर्ण केले.

आपणही त्यांच्या कामाचा आदर्श घेत शेतकरी, समाज, देशासाठी काम करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रतिकूलपती धनंजय मुंडे यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले.
आज वातावरण बदलाने असंख्य प्रश्‍न तयार केले आहेत. या वातावरणात टिकाव धरतील असे वाण शेतकऱ्यांना हवे आहेत. कृषी पदवीधरांनी आजवर घेतलेल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा फायदा आता शेती आणि शेतकऱ्यांना करून द्यावा.

कृषी पदवीधरांनी मातीशी नाळ टिकवून ठेवत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे असे देखील मुंडे यांनी सांगितले. आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात कृषिमंत्री मुंडे यांनी भविष्यातील शेती आणि कृषी पदवीधरांची उत्कृष्ट सांगड घालत कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेती क्षेत्रातील वापर ठळकपणे अधोरेखित केला.

कृषी विद्यापीठाचे दीक्षांत सभागृहात पदविकांक्षीच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत संपन्न झालेल्या या दिमाखदार आणि शिस्तबद्ध कार्यक्रमाचे प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पदविकांक्षींसमोर दीक्षांत भाषण करताना नवसारी कृषी विद्यापीठ, नवसारी (गुजरात) चे कुलगुरू डॉ. झिनाभाई पटेल यांनी भविष्यातील जागतिक स्पर्धेचे गणितच विद्यार्थ्यांना उलगडून सांगितले.

भारतीय कृषी शिक्षण, भारतीय अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्राचे महत्त्व, भारतीय संस्कृती आणि कृषी क्षेत्र, कृषी तंत्रज्ञान, राज्यातील कृषी क्षेत्रांची सद्यस्थिती, ॲग्री स्टार्टअप, व अंतर्गत उपलब्ध असलेल्या संधी आदींवर अतिशय विस्ताराने बोलताना डॉ. पटेल यांनी उपस्थित युवा वर्गाला उज्वल भविष्य विषयी अवगत केले. डॉ. पटेल यांनी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे सुरु असलेल्या उपक्रमांचे, आजवर केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.

या विद्यापीठाने विविध पीकवाण, यंत्र तंत्रांचा शोध लावत शेतकऱ्यांना फायदेशीर काम केले. सध्याही सुरु आहे. विद्यापीठ उच्चतम योगदान देत असल्याचे सांगितले. शिकणे ही आयुष्यभराची प्रक्रिया आहे. पदवी हा शिक्षणाच्या प्रवासातील मैलाचा दगड आहे. निर्माण झालेली आव्हाने सुधारण्यासाठी, उत्कृष्टतेसाठी संधी देतात. यातील यशाचे रहस्य कठोर परिश्रमात आहे. व्यावहारिक जीवनात ज्ञानाचा वापर खऱ्या पदविधराचे प्रतीक मानले पाहिजे. त्यामुळे या मार्गावर चालण्यासाठी तयार व्हा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे स्वागत पर भाषण व अहवाल वाचन विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. शरद गडाख यांनी केले. याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरु डॉ. प्रशांत पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य विद्यापीठाचे सर्व माजी कुलगुरू सोबतच विद्या परिषदेचे सन्माननीय सदस्य विचार मंचावर उपस्थित होते.

आज संपन्न झालेल्या दीक्षांत समारंभात एकूण 4040 स्नातकांना निरनिराळ्या विषयात पदव्या प्रदान करण्यात आल्यात.यामध्ये बी.एस्सी (कृषि) 2904, उद्यान विद्या 205, वन विद्या 29, कृषि जैव तंत्रज्ञान 124, कृषि व्यवसाय व्यवस्थापन 70, बी. टेक. अन्नशास्त्र 119, बी.टेक (कृषि अभियांत्रिकी) 147, पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखा मध्ये एम.एस्सी (कृषि) 271, उद्यान विद्या 36, वनविद्या 08, कृषि अभियांत्रिकी 27, एम. बी. ए (कृषि) 27, पीएच.डी 36 आदीचा समावेश आहे.

उपरोक्त 4040 स्नातकांपैकी दीक्षांत समारंभात 36 आचार्य पदविधारक, 259 स्नातकोत्तर, 2538 पदवीपूर्व पदवीकंक्षी स्वतः उपस्थित राहून पदवी स्वीकारल्या तर उर्वरित 1207 स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थी संबंधित महाविद्यालयाच्या स्तरावर अप्रत्यक्षरीत्या पदवी प्रदान करण्यात आल्या. कृषि पदवी अभ्यासक्रमातुन भावेश अग्रवाल, कृषि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमातुन रामूराम जाट आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातुन कु.पूनम अघाव यांनी यंदा मुले तथा मुलींमधून सर्वाधिक पदकांची कमाई केली आहे.

यासह एकूण 31 विद्यार्थ्यांनी सुवर्ण, 14 रौप्य, 31रोख बक्षिसे व 03 पुस्तकं स्वरूपात बक्षिसे व पदके प्राप्त करीत इतर विद्यार्थ्याना प्रेरित केले आहे. तर 1 उत्कृष्ट शिक्षक, 10 उत्कृष्ट संशोधक, 2 उत्कृष्ट कर्मचारी व 1 उत्कृष्ट संशोधन परितोषिक यांचा समावेश आहे, अश्या प्रकारे एकूण 45 विद्यार्थी व अधिकारी यांनी 80 पदके व रोख पारितोषीके प्राप्त करीत विद्यापीठ व आपले विभागाला लौकिक प्राप्त करून दिला आहे.

आज सकाळी ठीक 10 वाजता सुरु झालेल्या या समारोहात निमंत्रित मान्यवर व पदवीकांक्षी विद्यार्थी -विद्यार्थ्यांनी व पुरस्कार प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी वाद्य वृंदाद्वारे मान्यवरांना दीक्षांत मिरवणुकी द्वारे कार्यक्रम स्थळी आगमन झाले राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कुलसचिव सुधीर राठोड यांनी कुलपतीना दीक्षांत समारंभ सुरू करीत असल्याचे घोषित करण्यासंबंधी निवेदन केले.

माननीय कुलपतींच्या मान्यतेने दीक्षांत समारंभाची सुरुवात झाली. सुरुवातीला विद्यापीठ गीत,सरस्वती वंदना झाली. माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या स्वागत पर भाषणानंतर पदवीदान समारंभाला प्रारंभ झाला विविध गुणवत्ता व पारितोषिक धारण धारकांना त्यांची पदके व पारितोषिके मान्यवरांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आली. याप्रसंगी सर्व नवपदवीकांक्षीना कुलपतींनी दीक्षांत उपदेश दिला. त्यानंतर मान्यवरांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले पसायदान, राष्ट्रगीता नंतर कुलपतीनी दीक्षांत समारंभ संपन्न झाल्याचे घोषित केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: