Wednesday, January 22, 2025
Homeराज्य१०६ वर्षीय आकोट बार असोसिएशनने भिडू बदलले…अध्यक्षपदी टिकार, सचिव गुहे, तर उपाध्यक्षपदी...

१०६ वर्षीय आकोट बार असोसिएशनने भिडू बदलले…अध्यक्षपदी टिकार, सचिव गुहे, तर उपाध्यक्षपदी देव आले…परंतु आकोट बार असोसिएशन नोंदणीकृत नसल्याचा आरोप…प्रकरण उच्च न्यायालयात…

आकोट – संजय आठवले

अगदी इंग्रज राजवटी पासून सुरू असलेल्या आकोट बार असोसिएशन ची नवी कार्यकारिणी निवडणुकीच्या लोक तांत्रिक मार्गाने घोषित करण्यात आली असून अध्यक्षपदीॲड. गजानन टिकार, सचिव पदी ॲड. गोपाल गुहे तर उपाध्यक्षपदी ॲड. महेश देव यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.

परंतु तब्बल १०६ वर्षांपासून ही बार असोसिएशन नोंदणीकृत न केल्याने अधिकृत नसल्याचा आरोप काही असंतुष्ट लोकांनी केल्याने प्रकरण उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचे निवाड्यापर्यंत जुन्या असोसिएशनचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे.

आकोट बार असोसिएशनची स्थापना १०६ वर्षांपूर्वी थेट इंग्रज राजवटीमध्ये १९१८ साली करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत कोणत्याही शासकीय नोंदणीविना या वकील संघटनेचा कारभार अगदी चोखपणे विना तक्रार सुरू आहे. असाच कारभार हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर तथा अकोला बार असोसिएशनचा ही सुरू आहे. शंभरी पार केलेल्या या वकील संघटनांचे अध्यक्ष कैक वेळा बदलले. कैक नवीन आले. परंतु संघटनेबाबत कोणताही विवाद कधीच निर्माण झाला नाही.

त्याच परंपरेनुसार आकोट बार असोसिएशनने २०२५ या नवीन वर्षाकरिता निवडणूक घेऊन नवी कार्यकारणी घोषित केली आहे. त्यामध्ये ॲड. गजानन टिकार यांची अध्यक्ष पदी तर ॲड. गोपाल गुहे यांची सचिव पदी अविरोध निवड करण्यात आली. त्यासोबतच उपाध्यक्ष म्हणून ॲड. महेश देव, सहसचिव ॲड.सौ. अवंती जोत आणि कोषाध्यक्ष म्हणून ॲड. सुरेश कुलकर्णी यांना निवडण्यात आले. या

प्रसंगी आकोट बार असोसिएशनचे सन्माननीय जेष्ठविधीज्ञ आर बी अग्रवाल, एस एफ काझी, बि आर गांधी, एस के पुराडउपाध्ये, के आर देशपांडे, आर बी उमाळे, आर आर पळसपगार, ए आर कट्टा, जे डब्ल्यू गावंडे,जि व्ही बोचे, राजीव गांधी, आणि ॲड. सांगोळे यांचे मार्गदर्शन आणि ॲड. सौ. राधिका देशपांडे, रफी काझी, एस एन पळसपगार, विजय चौहान, योगेश पुराडउपाध्ये, ऋचा ठाकूर, मनीष मस्के, राहुल वानखडे, प्रशांत गुहे, सागर वसु, सचिन भटकर आणि ॲड. जुनेद यांचे सहकार्याने ही निवडणूक शांततेत पार पडली.

परंतु या शांततेमध्ये एक हलकीशी हुरहुर असल्याचे जाणवत होते. त्याची सुरुवात २०२२ मध्ये झाली. आकोट बार असोसिएशन मधीलच काही जणांनी आकोट जिल्हा बार असोसिएशन नावाने धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली.

ही नोंदणी केली असली तरी त्या लोकांनी २०२२ नंतर झालेल्या आकोट बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. अशा स्थितीत सन २०२३-२४ च्या कालखंडात महाराष्ट्र बार कौन्सिलने आकोट बार असोसिएशनला आपले मान्यतेचे प्रमाणपत्र देऊन अधिकृत दर्जा दिला.

परंतु काहीच दिवसात जादूची कांडी फिरल्यागत महाराष्ट्र बार कौन्सिलच्या अफिलेशन कमिटीने आकोट बार असोसिएशनची मान्यता काढून ती आकोट जिल्हा बार असोसिएशनला दिली. त्यासोबतच १०६ वर्षीय आकोट बार असोसिएशन ने दोन वर्षिय आकोट जिल्हा बार असोसिएशन मध्ये सामील व्हावे असा अहवालही दिला.

परंतु १०६ वर्षांची आपली वैभवशाली आणि गौरवशाली ऐतिहासिक परंपरा मोडीत काढून ती ठोकरण्यास आकोट बार असोसिएशनच्या सर्व जुन्या जाणत्या तसेच तरण्या वकिलांनीही एक मुखी विरोध दर्शविला. परिणामी या सर्व परंपराप्रेमी वकील मंडळींनी महाराष्ट्र बार कौन्सिलच्या अफिलेशन कमिटीच्या अहवालाला उच्च न्यायालय नागपूर येथे आव्हान दिले आहे.

आकोट बार असोसिएशन ही वकील संघटना इंग्रज कालीन असल्याने या संघटनेला एक ऐतिहासिक वारसा प्राप्त झालेला आहे. असा इतिहास जतन करून ठेवावयाचा असतो, याची जाणीव उच्च न्यायालयाला असल्याने न्यायालयाने आकोट बार असोसिएशनला दिलासा देऊन ह्या प्रकरणाचा निवाडा लागेपर्यंत या संघटनेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच अशा ऐतिहासिक संघटनांबाबत वेगळे नियम बंधने असल्याने आकोट बार असोसिएशनचे सदस्य आपल्या विजयाबद्दल आश्वस्त आहेत.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: