राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल केला गौरव…
पातूर – निशांत गवई
वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या शौर्याचा इतिहास अजरामर ठेवण्यासाठी तसेच महाराणा प्रतापांचा गौरवशाली इतिहास आजच्या युवा पिढीला ज्ञात व्हावा हा उद्देश समोर ठेवून नुकतेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका व राजपूत समाज संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड पुणे येथे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर लगेच या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये पातुर येथील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक शंकर गाडगे यांचे चिरंजीव संकल्प गाडगे यांने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून त्याला मुंबईचे उपजिल्हाधिकारी माननीय राजेंद्रसिंह जाधव व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, ट्रॉफी व मेडल देऊन गौरवण्यात आले.
पिंपरी चिंचवड येथे आयोजित वकृत्व स्पर्धेत संकल्पने महाराणा प्रताप यांचा गौरवशाली इतिहास अत्यंत प्रभावी शैलीतून मांडला तसेच महाराणा प्रताप यांच्या जीवनातील चित्त थरारक प्रसंगाचे वर्णन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडले.
संकल्पच्या या यशाबद्दल त्याचा नुकतेच पातूरचे कर्तव्यदक्ष ठाणेदार मा.हरिष गवळी साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला व त्याला भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.संकल्पच्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.