Sunday, November 17, 2024
Homeमनोरंजनठाकूर अनुप सिंग साकारणार "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज"…

ठाकूर अनुप सिंग साकारणार “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज”…

  • पुणे येथे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यात अवतरले शंभूराजे
  • मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज”

गणेश तळेकर

महाराष्ट्राचा महासिनेमा “सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटाच्या भव्य यशानंतर उर्विता प्रॉडक्शन्सने भव्य आणि बिग बजेट अशा “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” या चित्रपटाची घोषणा केली होती. सुरुवातीपासूनच अत्यंत गोपनीयता पाळल्याने छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका कोण साकारणार?

mahavoice-ads-english

याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, त्यातच श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरने ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत पुणे येथे संस्थापक, अध्यक्ष नवनाथ पठारे पाटील यांच्या सूर्योदय प्रतिष्ठान आयोजित भव्यदिव्य अशा सोहळ्यात हजारो शिवशंभू भक्तांच्या उपस्थितीत “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

याप्रसंगी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ठाकूर अनुप सिंग याने छत्रपती संभाजी महाराजांच्या अवतारात सोहळ्यामध्ये प्रवेश केला आणि हजारोंच्या गर्दीतील प्रत्येकाला शंभूराजांचे दर्शन मिळाल्याचे समाधान व अप्रूप पाहायला मिळाले. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमुळे ठाकूर अनुप सिंग छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले.

पोस्टरमध्ये पार्श्वभूमीला भगवान शंकराची मूर्ती व त्यांचे साधक असून त्यांच्या पुढे एका हातात भगवा झेंडा व दुसऱ्या हातात त्रिशूल घेतलेले, अंगावर वार आणि डोळ्यात धार असलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे रौद्र रूप दर्शविण्यात आलेले आहे. अतिशय नेत्रदीपक अशा या पोस्टरमुळे चित्रपट भव्य आणि ऍक्शनपॅक्ड असणार आहे असे दिसून येत आहे. आता या चित्रपटात अजून कोणकोणते कलाकार कोणत्या भूमिका साकारणार? याची उत्कंठा चित्रपट रसिकांमध्ये वाढलेली आहे.

पुण्यात जन्म झालेला अभिनेता ठाकूर अनुप सिंग हा आकर्षक व्यक्तिमत्व आणि पिळदार शरीरयष्टीसाठी ओळखला जातो, त्याने आपल्या उत्तम अभिनयाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रामुख्याने तेलुगु आणि काही तामिळ व कन्नड चित्रपट गाजवले आहेत. त्याने सूर्या बरोबर सिंघम ३, अल्लू अर्जुन बरोबर सूर्या द सोल्जर, रवी तेजा सोबत खिलाडी, साई धरम तेज बरोबर विनर तसेच विद्युत जामवाल बरोबर कमांडो २ हा हिंदी अशा अजूनही चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या सोबतच 2013 च्या महाभारत टीव्ही मालिकेत त्याने धृतराष्ट्राची भूमिका केली होती.

ठाकूर अनुप सिंग मूलतः एक बॉडीबिल्डर असल्याने आपल्या शरीराची खूप काळजी घेतो, त्याने 2015 मध्ये बँकॉक, थायलंड येथे झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व उत्तुंग आणि बलदंड होते त्यामुळे ठाकूर अनुप सिंग याने ही भूमिका साकारताना आपल्या व्यक्तिमत्वावर आणि शरीरावर विशेष मेहनत घेतली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत बिग बजेट चित्रपट फार कमी प्रमाणात बनतात त्यापैकीच एक “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” चित्रपट आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनकार्याचा पट खूप भव्य आणि साहसी आहे.

त्यामुळे मोठ्या पडद्यावरसुद्धा तो भव्यदिव्यच दिसला पाहिजे असे निर्मात्यांचे ठाम मत होते त्यामुळे या चित्रपटाची निर्मितीमूल्ये ही अतिशय उच्च दर्जाची ठेवताना बजेटची चिंता न करता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर भव्य चित्रपट पाहण्याचा समृद्ध अनुभव मिळेल असा चित्रपट बनविण्यात आला आहे.

उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित आणि संदीप रघुनाथराव मोहितेपाटील प्रस्तुत “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” चित्रपटाचे निर्माते शेखर रघुनाथराव मोहितेपाटील, सौजन्य सूर्यकांतजी निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा आणि केतनराजे निलेशराव भोसले आहेत तर तुषार विजयराव शेलार यांनी दिग्दर्शन केले आहे.

mahavoice-ads-english

तसेच कथा आणि पटकथा संदीप रघुनाथराव मोहितेपाटील आणि डॉ. सुधीर निकम यांनी लिहिली आहे. “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” हा चित्रपट दोन भागात मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून यातील पहिला भाग २०२४ मध्ये लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: