हसत खेळत तणावमुक्ती या कार्यक्रमातून कर्मचाऱ्यांना मिळाली नवऊर्जा…
महावितरणचा १९ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा…
अमरावती – महावितरण कंपनीच्या निर्मितीपासून आतापर्यंत कंपनीने उल्लेखनीय प्रगती केली आहे. विद्युत पुरवठा क्षेत्रातील कामाचे सुयोग्य विभाजन आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी विद्युत कायदा २००३ नुसार ६ जून २००५ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती असे तीन कंपन्यांमध्ये त्रिभाजन करण्यात आले. विद्युत कायदा २००३ च्या तरतुदी ह्या मुख्यतः ग्राहककेंद्री असून त्यानुसार महावितरण कंपनीच्या व्यवस्थापनात आणि कार्यपध्दतीत वेळोवेळी बदल करण्यात आले असल्याचे प्रतिपादन मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह अमरावती येथे (दि.११ जून) रोजी झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता दिपक देवहाते, कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आनंद काटकर, अशोक देशमुख, सहाय्यक महाव्यवस्थापक रूपेश देशमुख, कार्यकारी अभियंते भारतभूषण औघड, अनिरूध्द आलेगावकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, यांच्यासह अधिकारी, अभियंते व कर्मचारी आपल्या कुटूंबासमवेत उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मुख्य अभियंता म्हणाले की, मागील १९ वर्षाच्या काळात महावितरणच्या ग्राहकसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे आणि विजेची मागणी ही १३ हजार मेगावॉट वरून २५ हजार मेगावॅट पर्यंत दुपटीने वाढली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी प्रचंड वाढलेली आहे. बदलत्या काळानुसार महावितरणने आपल्या कार्यपद्धतीमध्ये तंत्रज्ञानावर आधारीत अनेक बदल केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे स्मार्ट मीटर योजना. स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांना अचूक वीज बिलासोबत वीज वापराची दैनंदिन माहिती मिळणार आहे. शिवाय ग्राहकांना वीज वापरावर नियंत्रण ठेवून सोयीनुसार विजेचा वापर करता येणार आहे.
हॅपी अवर्स सुविधा असणारे स्मार्ट मीटर हे सुरूवातीच्या काळात पोस्टपेड आणि नंतर प्रीपेडमध्ये रूपांतरीत होणार आहे. महावितरणच्या दृष्टीनेही स्मार्ट मीटर हे उपयोगाचे असून कंपनीचा मिटर रिंडीग घेण्याचा खर्च वाचणार आहे. शिवाय विज बिल वसुलीसाठी ग्राहकांच्या दारी जावे लागणार नसल्याने कर्मचाऱ्यांवरचा वसुलीच्या कामाचा ताण कमी होऊन त्यांना वीज यंत्रणेशी संबंधित तांत्रिक कामावर अधिक लक्ष देता येईल. परिणामी ग्राहकांना दर्जेदार आणि अखंडित सेवा देता येईल.
यावेळी अतुल वडे आणि मोहम्मद मुजाहिद अनवर या दोन कर्मचाऱ्यांना अनुक्रमे नेमबाजी व कुस्ती क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. किरण संजय पारीसे आणि श्रावणी अभिजीत फरकाडे या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी अनुक्रमे वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात मिळविलेल्या विशेष प्राविण्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
वीज ही अत्यावश्यक आणि विकासाच्या चक्राला गती देणारी सेवा असल्याने वीज सेवेचा संबंध सामान्यांपासून ते उदयोजकांपर्यत सर्वांशी येतो. त्यामुळे वीजपुरवठा वादळ वाऱ्यामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे खंडित झाल्यास, रात्र-दिवस दुरुस्तीचे काम करूनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. तसेच वीज हे चुकीला माफी नसलेले क्षेत्र असल्याने कर्मचाऱ्यांना येणारा ताण कसा घालवावा आणि कामाप्रती उत्साह कसा वाढवावा यासाठी प्रसिध्द व्याख्याते श्री. अशोक देशमुख, पुणे यांचे “हसत खेळत तणावमुक्ती” या कार्यक्रमाद्वारे कर्मचाऱ्यांना नवऊर्जा देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधूसुदन मराठे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय आद्यश्री कांबे यांनी करून दिला, कार्यक्रमाला एका सुत्रात बांधण्याचे काम प्रफुल्ल देशमुख आणि प्रियंका सोळंके यांनी केले, तर आभार ज्ञानेश्वर अंबाडकर यांनी मानले.