आलापल्ली शाखेचा विजयादशमी उत्सव…
अहेरी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा आलापल्ली चा विजयादशमी उत्सव ग्रीनलँड शाळेच्या पटांगणावर घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून विभाग प्रचारक दीनदयाल कावरे , प्रमुख अतिथी म्हणून आल्लापल्ली चे उपसरपंच विनोद अकनपल्लीवार ,तालुका कार्यवाह मंगेश परसावार आदींची मंचावर हजेरी होती.
याआधी आल्लापल्ली येथील श्री राम मंदिर ते वीर बाबुराव चौक ग्रामपंचायत मार्गे स्वयंसेवकाचे पथसंचलन काढण्यात आले. यावेळी स्वयंसेवकांनी व्यायाम योग व सुर्यनमस्काराची प्रात्यक्षिक सादर केली. यावेळी बोलतांना प्रमुख वक्ते दीनदयाल कावरे म्हणाले, आपला हिंदू समाज हा आत्मविस्मृत झाला होता.
हजारो वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या समाजाला जागृत करण्याची आवश्यकता होती.त्यासाठी हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी संघाची 1925 साली स्थापना करण्यात आली.संघाच्या शाखेत नित्यशक्तीची आराधना केली जाते.संघाने आवश्यकतेनुसार विविध क्षेत्रांत नव्या संघटनेची निर्मिती साठी पुढाकार घेतला.
आज संघाचा मोठा वटवृक्ष झाला आहे. कार्यात सुलभता येण्यासाठी संघात विविध कार्यविभागाची रचना करण्यात आलेली आहे. हे सर्व समाजाला संघाच्या सोबत जोडण्यासाठी करण्यात आले.संघाचे काम उत्तम चारित्र्य, चांगला मनुष्य घडविणे आहे. आपल्या समाजात सामाजिक समरसता येण्यासाठी समाजात जाणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर आपल्या जीवनात शक्ती,भक्ती व ज्ञानाचे महत्वाचे स्थान आहे.विजयादशमी हा पर्व त्याचे प्रतीक आहे. आजच्या घडीला देशभरात संघाचे 1लाख 30 हजाराच्या वर सेवाकार्य चालते. या माध्यमातून शेकडो स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्था समाजाशी जोडल्या गेल्याचे प्रतिपादन कावरे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ,आभार सुभाष शेंडे, वैयक्तिक गीत गजानन गादेवार, सुभाषित आलोक शील,अमृतवचन राजेंद्र बंधुकवार तर मुख्य शिक्षक म्हणून राकेश गडमवार तर प्रार्थना गायक म्हणून रवी ताकलवार यांनी काम बघितले. कार्यक्रमाला अल्लापलीचे सरपंच शंकर मेश्राम सोबत आलापल्लीतील गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.