अकोला – संतोषकुमार गवई
‘ मनरेगा ‘ अंतर्गत शेतात बांबू लागवडीस अनुदान देय असून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी अर्ज करावा. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड होण्यासाठी लोक सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
राज्यातील वातावरणीय बदलाच्या संकटाला तोंड देऊन शाश्वत विकाम साधण्यासाठी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीस शेतकऱ्यांना उपयुक्त करून जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणुन बांबूचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स गठित करण्यात आली आहे.
सन 2024-25 या वर्षात अकोला जिल्ह्यात तालुकानिहाय व विभागनिहाय बांबू लागवडीचे 2 हजार हेक्टर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीद्वारे बांबू लागवडीसंदर्भात सर्व यंत्रणांना उदिष्ट्ये ठरवून देण्यात आली आहेत.
बांबू लागवडीमध्ये वैयक्तिक बांधावरील बांबू लागवड, सलग लागवड आणि शासकीय जमिनीवर बांबू लागवड करणेबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांचे शेतामध्ये सलग लागवड करणेकरीता प्रती हेक्टर अकुशल रक्कम 5 लक्ष 21 हजार 681 व कुशल रक्कम 1 लक्ष 75 हजार 305 रु. असे एकूण 6 लक्ष 96 हजार 986 रु. अनुदान देण्यात येईल. तसेच बांधावर बांबू लागवड करण्याकरीता मनरेगा अंतर्गत अनुदान देय आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अकोला जिल्हयात सन 2024-25 या वर्षामध्ये बांबू लागवड करणेकरीता अर्ज संबंधित ग्रामपंचायत, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण विभाग यांचेकडे सादर करावेत व अकोला जिल्हयात मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड करण्यासाठी लोकसहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.