Sunday, November 17, 2024
Homeराज्य"मांगं काळ्या करता अन् काम असलं कि जवळ येता?"…आमदार भारसाखळे यांनी भाजप...

“मांगं काळ्या करता अन् काम असलं कि जवळ येता?”…आमदार भारसाखळे यांनी भाजप कार्यकर्त्याला झापले… फडणवीस यांनी दिलेल्या प्रगती पुस्तकाने आमदारांचे संतुलन बिघडल्याची चर्चा…

आकोट – संजय आठवले

अकोला जिल्ह्यातील भाजपच्या एका आमदाराने एका संघ प्रचारकाचा अपमान केल्याच्या वृत्ताची शाई वाळण्यापूर्वीच आकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांनी एका भाजप कार्यकर्त्याला चांगलेच झापून अपमानित केल्याची चर्चा आकोट परिसरात रंगू लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिलेल्या प्रगती पुस्तकातील मजकुराने आमदार भारसाखळे बिथरले असल्याचीही भाजप वर्तुळात चर्चा आहे.

काहीच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील एका भाजप आमदाराने एका संघ प्रचारकाचा अपमान केल्याचे वृत्त एका राजकीय न्यूज पोर्टलने प्रकाशित केले होते. त्या संदर्भात संघातील सूत्रांची संपर्क साधला असता ती फेक न्युज असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचे कारण देताना त्यांनी सांगितले कि, मुळात संघ प्रचारकांनी आमदारांना भेटण्याची रीतच नाही.

परंतु आमदाराशी काही काम असल्यास प्रचारकाने जिल्हा संघ चालका मार्फत आपले काम आमदारांना सांगावे अशी वहिवाट असल्याचेही सूत्रानी सांगितले. अशा स्थितीत संघ प्रचारकास आमदारास प्रत्यक्ष भेटण्याची रीतच नसल्याने हे वृत्त निराधार असल्याचे त्या सूत्राचे म्हणणे होते.

परंतु कनिष्ठ स्तरातील एका संघ कार्यकर्त्याने सांगितले कि, असे झालेले आहे. मात्र गवगवा होऊ नये म्हणून त्या अपमानित संघ प्रचारकाने हा प्रकार वरिष्ठांकडून दडवून ठेवलेला आहे. तरीही या घटनेची काही प्रमाणात प्रसिद्धी झालीच.भाजप आमदाराकरवी संघ प्रचारकाच्या या अपमानाचे वातावरण निवळते न निवळते तोच आता आकोट भाजपचे आमदार प्रकाश भासाकळे यांनी भाजपच्याच एका कार्यकर्त्याची आपल्या निवासस्थानी चांगलीच कान उघाडणी केल्याच्या चर्चेने वातावरण पुन्हा तापू लागले आहे.

या संदर्भात सूत्रांनी सांगितले कि, आकोटचा एक भाजप कार्यकर्ता आमदार भारसाखळे यांचे भेटीस गेला. आमदारांभोवती गर्दी नसल्याने हा कार्यकर्ता थेट आमदार महोदयांसमोर जाऊन बसला. परंतु त्याला पाहताच भारसाखळे यांचे पित्त खवळले. त्यांनी त्या कार्यकर्त्याला खडे बोल सुनावले. आमच्या मांगं आमच्या काळ्या करता अन् काम असलं की गोंडा घोयता? कायले आले अथी? हे ऐकल्यावर अपमानित झालेला तो कार्यकर्ता हिरमूसला होऊन तेथून निघून गेला.

आमदार भारसाकळे यांच्या अशा वर्तनाचे कारण सांगण्यात आले ते असे कि, हा कार्यकर्ता भारसाखळे यांच्या विरोधी कारवाया करणाऱ्या गटाचा मानला जातो. त्या गटाने उच्च स्तरावर भारसाखळेंच्या अनेक तक्रारी केलेल्या आहेत. त्याद्वारे संघ आणि भाजपच्या वरिष्ठ स्तरावर त्यांचे बाबत मोठी कटुता निर्माण झालेली आहे. त्यामुळे या विरोधी गटाच्या सदस्यांबाबत भारसाखळे यांच्या मनात प्रचंड राग आहे. तोच या भेटीत उफाळून आला.

यासोबत दुसरे कारण असे सांगितले जाते कि, नुकतीच देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गरवारे क्लब मुंबई येथे भाजप आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत केलेल्या सर्वेची चर्चा करण्यात आली.

त्यामध्ये चक्क ४० प्रतिशत आमदार खासदार पक्षीय ध्येयधोरणे राबविण्याच्या कसोटीवर नापास झाल्याचे दिसून आले. या सर्वेचा निष्कर्ष हा निघाला कि, मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करावयाचे असेल तर सारे नापास उमेदवार बदलवा. महत्त्वाचे म्हणजे नापासांच्या या यादीत विकास पुरुष आमदार प्रकाश भारसाखळे यांचेही नाव असल्याची दबक्या स्वरात कूजबूज आहे.

ह्या चर्चेनंतर बैठकीत उपस्थित आमदारांना त्यांची प्रगती पुस्तके देण्यात आली. या पुस्तकात भारसाखळे यांची प्रगती ऐवजी अधोगती दर्शविण्यात आल्याची आतील माहिती आहे. त्यामुळे भारसाखळे यांनी पुन्हा एकदा आकोटचा आमदार होण्याचे मार्गात हे अधोगती पुस्तक मोठी धोंड ठरणार आहे.

आपल्यावर ही पाळी येण्यात आकोटातील भाजप अंतर्गत विरोधी गटाचाही मोठा वाटा असल्याची भारसाखळे यांची धारणा झालेली आहे. त्यामुळे आपल्या कारकिर्दीचा अंतिम पडाव असल्यावरही आमदार भारसाकळे यांनी त्या भाजप कार्यकर्त्याला आपले घरून हाकून दिल्याचे बोलले जात आहे.

संघ प्रचारकाचा अपमान व भाजप कार्यकर्त्याचा मानभंग या दोन्ही घटना खऱ्या असतील तर अकोला जिल्ह्यातील भाजप आमदारांना “आपली भाकरी फिरविली जाणार” असल्याची धास्ती बसली आहे. त्यामुळे सैरभैर झालेले हे आमदार “विनाशकाले विपरीत बुद्धी” असे वर्तन करीत असल्याचे दिसत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: