रामटेक – राजू कापसे
शेत नावावर करण्याच्या विषयावरून तालुक्यातील मौजा काचुरवाही, मसला येथील तलाठयाला तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज ६ फेब्रुवारी ला रंगेहात अटक केली. कारवाईमुळे परिसरातील तलाठी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.
श्री.मुकेश दुलिराम फुलबांधे वय ४४ वर्ष, पद- तलाठी मौजा काचुरवाही,अतिरिक्त प्रभार मौजा मसला. ह.मु. ज्ञानदीप कॉन्व्हेंट जवळ शितलवाडी असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे. सविस्तर माहितीनुसार तक्रारदार यांचे वडिलांचे नावावरील शेत सर्व्हे न.२०८/२ हा तक्रारदार यांचे काकाचे नावावर आणि तक्रारदार यांचे काकाचे नावावरील शेत सर्व्हे न.२०८/३, २८८ हा तक्रारदार यांचे वडिलांचे नावावर करण्याचा अदलाबदलीच्या लेखावरून फेरफार करून देण्याकरिता, आरोपी तलाठयाने तक्रारदार यांना ५,००० रुपये लाचेची मागणी केली मात्र तडजोड अंती ४,००० रुपये स्विकारण्याचे ठरले.
त्यानुसार तक्रारदार यांचे कडून ४,०००रू लाच रक्कम स्विकारतांना आरोपी तलाठी स्वतः मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. रामटेक पोस्टेला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक, प्रवीण लाकडे, पोहवा. विकास सायरे,नापोशी सारंग बालपांडे, नापोशी राजू जांभूळकर, मनापोशी, वंदना नगराळे,सर्व ला.प्र.वि. नागपूर यांनी केलेली आहे.