सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त व राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्यावतीने स्टेशन चौकात “स्वराज्याचे शिवपर्व” हा कार्यक्रम सादर करण्यात आला. ‘स्वराज्याचे शिवपर्व’ या नृत्य, स्फूर्तिगीतांच्या कार्यक्रमाने शनिवारी सांगलीकरांमध्ये अनोखा उत्साह संचारला.
शिवजन्मापासून राज्याभिषेक आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे अभूतपूर्व दर्शन सांगलीकरांना घडवले. याशिवाय महाराष्ट्राची लोकसंस्कृती किती महत्वाची आहे. आणि या संस्कृतीची मुळे किती घट्टपर्यंत पोहोचली आहे. तिची महत्ता यावेळी सांगण्यात आली. या लोकसंस्कृतीची ओळखही या कार्यक्रमातून रसिकांना देण्यात आली.
या लोकसंस्कृतीची जोपासना करण्यासाठी नवीन पिढीने आता पुढे येण्याचेही आवाहन करत हा कार्यक्रम सादर होत गेला. या कार्यक्रमामध्ये असणारे संगीत तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंग हुबेहुब सादर करण्यात आल्याने सांगलीकर मंत्रमुग्ध झाले होते. अनेक प्रसंगाला तर टाळ्यांचा कडकडाट झाला.
भूपाळी ते भैरवी हा महाराष्ट्र लोककलेची परंपरा आहे. याची थोरवीही यावेळी विविध गीतातून सादर करत असताना महाराष्ट्र ही कशी कलानगरी बनली आहे. याचे हुबेहुब चित्र निर्माण करत महाराष्ट्र हा कलासक्त कसा आहे हेही यावेळी दाखवण्यात आले. स्वराज्याचे शिवपर्व सादर करताना तर सांगलीकर बेहद खुश झाले होते. सांगलीकरांनी या कार्यक्रमाला टाळ्याची आणि शिट्ट्याची साथ दिली त्यामुळे हा कार्यक्रम रंगत गेला.
राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावरील ओवी, आम्ही जिजाऊच्या मुली, जय जय जय जिजाऊ या गीतांद्वारे राजमाता जिजाऊ यांना वंदन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान आदर्शमाता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. आमदार सुधीर गाडगीळ युवा मंचच्या वतीने आठ आदर्शमाताचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये कॉमनवेल्थ गेममध्ये रौप्य पदक मिळविणाऱ्या संकेत सरगरची आई सौ. राजश्री महादेव सरगर, महिला महाराष्ट्र केसरी प्रतिक्षा बागडी हिची आई रेणुका रामदास बागडी, तसेच सौ. संपदा शंकर करे, सौ. मिनाक्षी शशिकांत पाटील, सौ. रूक्मिणी विष्णू बामणे, श्रीमती शमा सलीम शेख, सौ. हेमा बाबासाहेब चौगुले, इंदुबाई कयप्पा दुधाळ या आदर्श माताचा सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, अजिंकीयन फौंडेशनच्या अध्यक्षा मंजिरी गाडगीळ, भाजप शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, भाजप नेते शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी, माजी आमदार नितीन शिंदे, उपआयुक्त राहुल रोकडे, आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे, सभागृह नेत्या भारती दिगडे, दीपक माने, नगरसेवक युवराज बावडेकर, गजानन आलदर, सुधीरदादा गाडगीळ युवा मंचचे अध्यक्ष विश्वजित पाटील, अतुल माने, अश्रफ वांकर आदी मान्यवर उपस्थित होते.