रामटेक – राजु कापसे
परिषदेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान काँग्रेसचे जि. प. सदस्य दुधराम सव्वालाखे यांना झालेल्या मारहाणीनंतर जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव गज्जू उर्फ उदयसिंग यादव यांना पक्षातून २४ जुलै २०२१ रोजी निलंबित करण्यात आले होते.
हे निलंबन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने बुधवारी (१७ ऑगस्ट) संघटन व प्रशासन सरचिटणीस देवानंद पवार यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या आदेशाने यादव यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. निलंबन रद्द झाल्याची वार्ता रामटेक
विधानसभा क्षेत्रात समजताच गज्जू यादव यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष साजरा केला. निलंबन रद्द करण्यात आल्याच्या आदेशाची प्रत जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक तसेच गज्जू यादव यांना पाठविण्यात आली आहे.
सव्वालाखे यांना मारहाण झाल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल नागपूर विभाग प्रभारी चंद्रकांत हंडोरे व निवडणूक निरीक्षक रणजित कांबळे यांनी प्रदेश काँग्रेसकडे सादर केला होता. त्यात यादव यांनी पक्षशिस्त मोडून गैरवर्तणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या अहवालाच्या आधारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.