आकोट – संजय आठवले
भाजपा आमदार प्रकाश भारसाखळे यांची वृद्धावस्था, त्यांचे स्थानिक नसणे, निष्ठावंत भाजपाईंशी त्यांचे बेमुर्वत वर्तन या वैगुण्यांचा विरोध करीत आपण आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींना पूर्वीच पाठविल्यावरही भाजपा शहर व तालुका अध्यक्षांच्या अहवालानुसार आपल्याला भाजपातून निलंबित करून हेतू पुरस्सरपणे आपला अवमान व सामाजिक अप्रतिष्ठा केल्या प्रकरणी संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपली माफी मागावी अशी मागणी करीत अकोला जिल्हा ग्रामीण युवती प्रमुख कु. चंचल पितांबरवाले यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदार प्रकाश भासाखळे यांना सहा वर्षांकरिता निलंबित करण्याची डरकाळी फोडली आहे.
अकोला भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे यांनी कालच एक पत्र प्रकाशित करून पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवीत आकोट मतदार संघातील ११ जणांना निलंबित केले होते. अशा पक्षविरोधी कारवायासंदर्भात आकोट तालुका भाजपा अध्यक्ष राजेश रावणकार तथा शहराध्यक्ष हरीश टावरी यांनी पाठविलेल्या अहवालाचा आधार घेतल्याचे या पदात पत्रात नमूद केले आहे.
समाज माध्यमांमध्ये हे पत्र प्रसारित होताच आकोट मतदार संघामधील भाजपाईंमध्ये प्रचंड खळबळ उडाली. तर संबंधित ११ जणांमध्ये क्रोधाग्नि भडकलेला आहे. या संदर्भात पत्र परिषद घेऊन आपली भूमिका मांडण्याची त्यांची तयारी सुरू असतानाच कु. चंचल पितांबरवाले यांनी मात्र आपली भूमिका पक्षश्रेष्ठींना पाठविली आहे. त्यामध्ये आमदार प्रकाश भारसाकळे यांना सहा वर्षांकरिता निलंबित करण्याची मागणी करून त्यांनी पुन्हा खळबळ उडवली आहे.
चंचल पितांबरवाले यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मी मागील १७ वर्षांपासून पक्ष वाढीकरिता काम करीत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत अंग मोडून काम केल्याने खासदार अनुप धोत्रे यांचा विजय झालेला आहे. त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र प्रकाश भारसाखळे यांचे तिबार उमेदवारीला सर्वच स्तरातून प्रचंड विरोध होता.
त्यांचे आजार पण, वाढते वय, त्यांचे स्थानिक नसणे, नेते कार्यकर्त्यांशी त्यांचे वर्तन यासोबतच त्यांचे भोवती खुश-मस्कर्यांचे झालेले कोंडाळे यामुळे बहुतांश निष्ठावान लोक दुखावलेले होते. त्यात माझाही समावेश होता. त्यामुळे मी माझ्या पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे सन्मानपूर्वक पाठविला होता.
समाज माध्यमांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये या राजीनाम्याला व्यापक प्रसिद्धीही देण्यात आली होती. असे असताना आकोट तालुका भाजपा अध्यक्ष राजेश रावणकार व शहर अध्यक्ष हरीश टावरी यांचे आव्हानुसार ११ जणांचे निलंबन करण्यात आले. या यादीमध्ये माझ्या नावाचाही समावेश आहे.
मी आधीच राजीनामा दिल्यावरही ह्या निलंबनात माझे नाव प्रसिद्ध करणे हा खोडसाळपणा केवळ माझा अपमान व बदनामी करून जनमानसात माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयास आहे. ज्यांनी हा प्रयास केला आहे, त्यांनी प्रसिद्धी पत्र काढून माझी बिनशर्त माफी मागावी. असे न झाल्यास एका महिलेची अकारण बदनामी केल्याप्रकरणी करावी लागणारी कायदेशीर प्रक्रिया मला पार पाडावी लागेल. असा दमही पितांबरवाले यांनी या प्रसिद्ध पत्रकात दिला आहे.
पत्राच्या अंती त्यांनी प्रकाश भारसाकळे यांचे पक्ष विरोधी वर्तनाचा चांगलाच समाचार घेतला आहे. दर्यापूर येथे पक्षाचे उमेदवाराविरोधात आपला निकटस्थ उमेदवार उभा करून भारसाखळे यांनी त्याचे करिता मते मागितली. परिणामी मित्र पक्षाचे उमेदवार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांना पराभवाचा सामना करावा लागला.
पक्षविरोधात इतके मोठे कटकारस्थान करूनही भारसाखळे यांचेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे तत्त्वावर चालणारा पक्ष म्हणूवून दूसरीकडे घेतलेल्या अशा दुटप्पी भूमिकेने पक्षाची जनमानसात बदनामी होत आहे. येत्या पालिका, मनपा, जि प निवडणुकीत याचे दुष्परिणाम दिसणारच आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार प्रकाश भारसाखळे यांना सहा वर्षांकरिता निलंबित करावे अशी जोरदार मागणी चंचल पितांबरवाले यांनी केली आहे.