Friday, November 15, 2024
Homeमनोरंजन‘सुर्या’ चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा...

‘सुर्या’ चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा…

मुंबई – गणेश तळेकर

समाजातील विघातक प्रवृत्ती जेव्हा वरचढ ठरते तेव्हा, त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी एक नायक पुढे यावा लागतो. नैतिकतेचा बुरखा चढवून काही समाजकंटक चुकीच्या गोष्टी घडवून आणत असतात. त्यांच्या या कृत्याविरोधात लढा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुर्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत राहतो. त्याविरोधात लढण्याची धमक ‘सुर्या’ कशाप्रकारे आणतो याची चित्तथरारक कहाणी दाखविणारा ‘सुर्या’ हा मराठी चित्रपट ६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तत्पूर्वी चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा नुकताच दिमाखात संपन्न झाला. चित्रपटाच्या ट्रेलरची आणि गीतांची झलक यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आली. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत आणि एस.पी मोशन पिक्चर्स, डीके निर्मित ‘सुर्या’ या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांचे आहे.

‘सुर्या‘ चित्रपटाच्या माध्यमातून मी कथानायकाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पदार्पणातच असा अॅक्शनने भरलेला चित्रपट मिळाल्यामुळे माझे पदार्पण दमदार होणार आहे यापेक्षा दुसरी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट माझ्यासाठी नाही’ असा आनंद प्रसाद मंगेश यांनी व्यक्त केला. ‘अॅक्शन, इमोशन, ड्रामा आणि रोमान्स या सगळ्याचे परिपूर्ण पॅकेज असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल’ असा विश्वास सर्व कलाकारांनी यावेळी व्यक्त केला.

दिग्दर्शक हसनैन हैद्राबादवाला यांनी ‘सुर्या’ च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शन केले असून ‘एका उत्कृष्ट कलाकृतीचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मनोरंजनाने परिपूर्ण असा ‘सुर्या’ चित्रपट प्रेक्षक उचलून धरतील असा विश्वास निर्मात्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

उगवला पराक्रमी सुर्या सुर्या, मन गुंतता गुंतता, रापचिक रापचिक कोळीणबाई, मी आहे कोल्हापूरची लवंगी मिरची, बेरंग जवानी अशी वेगवेळ्या जॉनरची पाच गाणी चित्रपटात आहेत. बाबा चव्हाण, संतोष दरेकर, संजय मिश्रा, देव चौहान, मंगेश ठाणगे, प्रशांत हेडव यांनी लिहिलेल्या गीतांना देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. सुखविंदर सिंग, आदर्श शिंदे, नेहा राजपाल, राजा हसन, ममता शर्मा, कविता राम, खुशबू जैन यांचा स्वरसाज गाण्यांना लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य, उमेश जाधव, राहुल संजीव यांचे आहे.

रोमान्स आणि अॅक्शनचा पुरेपूर मसाला प्रेक्षकांना ‘सुर्या’ या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. अभिनेता प्रसाद मंगेश याच्यासोबत अभिनेत्री रुचिता जाधव नायिकेच्या रूपात दिसणार आहे. या दोघांसोबत या चित्रपटात हेमंत बिर्जे, उदय टिकेकर, पंकज विष्णु, अरुण नलावडे, गणेश यादव, संजीवनी जाधव, देवशी खांडुरी, हॅरी जोश, राघवेंद्र कडकोळ, दीपज्योती नाईक, प्रताप बोऱ्हाडे, प्रदीप पटवर्धन, दिलीप साडविलकर, जसबीर थंडी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

या चित्रपटाची निर्मिती रेशमा मंगेश ठाणगे यांनी केली असून सहनिर्मिती प्रसाद मंगेश, चेतन मंगेश यांची आहे. कार्यकारी निर्माते संग्राम शिर्के आहेत. कथा मंगेश ठाणगे यांची तर पटकथा विजय कदम मंगेश ठाणगे यांची आहे. संवाद विजय कदम, मंगेश केदार, हेमंत एदलाबादकर यांचे आहेत. संकलन राहुल भातणकर यांचे तर छायांकन मधु.एस.राव यांचे आहे. अॅक्शन डिरेक्टर अब्बास अली मोगल आणि मोझेस फर्नांडिस आहेत.

‘सुर्या’ चित्रपट ६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: