एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मॉर्फिंग व्हिडीओ प्रकरण अजूनही शांत झाले नसून ते आणखीन पेटणार असल्याचे आता दिसत आहे. तर यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. तुम्ही मुका घ्या नाही तर मिठ्या मारा. आम्हाला का टार्गेट करत आहात? आमच्या कार्यकर्त्यांना का अटक केली जात आहे? तुम्ही मुके घेतले, तुम्हीच निस्तरा. त्याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही, असं सुनावतानाच सार्वजनिक ठिकाणी मुका घेणारे सुर्वे हे पहिले गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच सुर्वे यांच्या मुलानेच तो व्हिडीओ लाईव्ह केला होता. त्याला अटक का केली नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत पुढे म्हणाले, आज दादा कोंडके हवे होते. त्यांचा सिनेमा गाजला होता. मुका घ्या मुका. मुका घ्या मुका प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करता? त्यांचा संबंध काय? हा सत्तेचा गैरवापर आहे. पोलीस यंत्रणेचा गैरवापर आहे. तुमच्या मुका प्रकरणात शिवसैनिकांचा संबंध काय? आम्ही सांगितलं का सार्वजनिक कार्यक्रमात मुका घ्यायला? मुळात तो व्हिडीओ खरा की खोटा हे आधी समोर येऊ द्या. मॉर्फींगचा विषय नंतर येईल, असं संजय राऊत म्हणाले.
मी तो व्हिडीओ पाहिला नाही. पण मला असंख्य कार्यकर्ते फोन करत आहेत. आमच्या घरावर पोलीस आले. आमच्या कार्यालयात पोलीस आले, असं कार्यकर्ते सांगत आहेत. काय प्रकार सुरू आहे? तो व्हिडीओ आमदाराच्या मुलानं शेअर केला. त्याला अटक केली का? नाही ना? मग कुणाची बदनामी करत आहात? तुमच्या पक्षातील अंतर्गत भांडणं असतील तर तुम्ही मिटवा. शिवसेनेला लक्ष्य करू नका, असा इशारा राऊत यांनी दिला.