क्वॉर्डन लिडर पुष्प कुमार वैद यांचे थरारक अनुभवकथन….
नागपूर – शरद नागदेवे
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात 93000 पाकिस्तानी सैनिक ढाका येथे आत्मसमर्पण करणार होते. जगातील सर्वात मोठे आत्मसमर्पण बघण्यासाठी पत्रकारांना हेलिकॉप्टरने नेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. हा ऐतिहासिक व तितकाच अविस्मरणीय क्षण अनुभवण्याठी मी माझ्या सहकार्यांनाही ‘स्मगल’ करून घेऊन गेलो.
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले वीरचक्रने सन्मानित क्वॉर्डन लिडर पुष्प कुमार वैद युद्धातील थरारक अनुभव सांगत होते. अखिल भारतीय हिंदी संस्था संघ नवी दिल्ली, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे विदर्भ रिजन, नागपूर व रोटरी क्लब ऑफ एलिट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रभाषा संकुल येथे ‘एआयएफ रोल इन 1970 वॉर विथ पाकिस्थान रिझल्टींग 93000 पाकिस्तानी सोल्जर सरेंडर’ या विषयावर पुष्प कुमार वैद यांचे अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे विदर्भ रिजन, नागपूरचे अध्यक्ष अजय पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद, निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक बी. के. सिंग, स्वप्ना नायर, रोटरी क्लब ऑफ एलिटच्या अध्यक्ष ममता जयस्वाल, राष्टभाषाच्या सचिव सुनीता मुंजे यांची उपस्थिती होती.
डिसेंबर 1971 च्या युद्धात फ्लाईट लेफ्टनंट पुष्प कुमार वैद हे रणांगणातील सैनिकांची रसद पोहोचवण्यासाठी तसेच, जखमी सैनिकांना रुग्णालयात आणण्याची जबाबदारी असलेल्या तीन हेलिकॉप्टरच्या युनिटमध्ये होते. तहानभूक विसरून त्यांनी कशी भारतीय सैनिकांपर्यंत रसद पोहोचवली, हेलिकॉप्टरवर कसे फायरिंग झाले, त्यातून सर्व कसे बचावले याचे थरारक अनुभव सांगितले.
या युद्धादरम्यान बारीकसारीक नोंदीची डायरीदेखील लिहीली होती, असे ते म्हणाले. भारतीय सैनिकांनी या युद्धात केलेल्या पराक्रमाची साधी नोंदही कोणी घेतली नव्हती, अशी खंत व्यक्त करताना पुष्प कुमार वैद यांनी निवृत्तीनंतर त्यावर पुस्तक लिहिले असून आता ते देशभरात ही पराक्रमाची कहाणी सांगण्यासाठी प्रवास करीत आहेत. 82 वर्षीय वैद यांच्या पराक्रमाला श्रोत्यांनी उभे राहून अभिवादन केले.
बी. के. सिंग यांनी वनविभागात येण्यापूर्वीचे त्यांचे आर्मी कमिशन ट्रेनिंग, त्यादरम्यान झालेले प्रशिक्षण आदीसंदर्भात माहिती दिली. 1971 च्या युद्धातील सिलगुडी येथील तसेच ढाकाच्या ऑपरेशनच्या काळातील अनुभव सांगितले. सुनील रामानंद यांनी गडचिरोली येथील नक्षलवाद्यांशी लढतानाचे प्रसंग सांगितले.
अजय पाटील यांनी प्रास्ताविकातून या उपक्रमामागचा उद्देश सांगितला. विविध क्षेत्रात उत्तम काम करणा-या व्यक्तींचा परिचय करून देणे व त्यांचे अनुभव नागपूरकरांपर्यंत पोहोचवणे, हा कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सना पंडित यांनी केले. ममता जयस्वाल यांनी आभार मानले. अमीन अझियानी, विवेक सिंग, रमेश बोरकुटे, अतुल दुरूगकर, दिपक मगरे, विजय भोयर यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.