- ५० हजारांची होती मागणी, पहीला हप्ता २५ हजार स्विकारतांना आवळल्या मुसक्या
- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी कारवाई
- रामटेक तहसिल कार्यालयात रचला सापळा
- अधिकारी – कर्मचाऱ्यांमध्ये उडाला हडकंप
रामटेक – राजू कापसे
शेतीचा एन.ए. ऑर्डर काढून दिल्याबद्दल बक्षीस म्हणून ५० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या रामटेक तहसिल कार्यालयातील महसुल सहायकासह पुरवठा निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दि. २० जुलै ला सापळा रचुन अटक केली. आरोपींची नावे अनिल उंदीरवाडे वय ४१ महसुल सहायक तथा अतिश जाधव वय ३१ पुरवठा निरिक्षक अशी असुन ते रामटेक तहसिल कार्यालय येथे कार्यरत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक तथा सापळा व तपासी अधिकारी प्रविण लाकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेक तालुक्यातील भिलेवाडा येथील रहीवाशी असलेले तथा हल्ली मुक्काम शिवाजी वार्ड रामटेक येथील तक्रारकर्ते यांना त्यांच्या मालकीच्या मौजा खुमारी येथील ३ एकर शेतीचे रहिवाशी प्रयोजनासाठी एन.ए. करायचे होते.
यासाठी लागणारी संपुर्ण दस्तावेजांची तथा इतर प्रक्रिया तक्रारकर्त्यांनी तहसिल कार्यालय रामटेक येथे पुर्ण केलेली होती. त्यानुसार तहसिलदार रामटेक यांनी सदर शेतीचा एन.ए. ऑर्डर सुद्धा काढला होता. मात्र याचा गैरफायदा घेत महसुल सहायक अनिल उंदीरवाडे यांनी ऑर्डर काढुन दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणुन ५० हजार रुपयांची लाचेची मागणी तक्रारकर्त्याला केली होती.
मात्र तक्रारकर्त्याला लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सरळ लाचलुचपत विभागाला तक्रार केली. त्यानुसार ठरल्याप्रमाणे आज दि. २० जुलै ला तहसिल कार्यालय येथे दुपारच्या सुमारास सापळा रचण्यात आला. दरम्यान तक्रारकर्त्याकडुन लाचेचा पहीला हप्ता म्हणुन २५ हजार रुपयांची लाच स्विकारतांना पुरवठा निरीक्षक अतिश जाधव याच्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुसक्या आवळल्या. दोन्ही आरोपींविरुद्ध रामटेक पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर ची कार्यवाही श्रीमती. अनामिका मिर्झापूरे, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि, नागपुर ग्रामीण यांचेसह सापळा व तपासी अधिकारी श्री. प्रवीण मुरलीधरराव लाकडे , पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नागपुर , पोहवा विकास सायरे, नापोशी सारंग बालपांडे, मनापोशी गिता चौधरी, अस्मिता मेश्राम, आशू श्रीरामे, करुणा सहारे,चालक नापोशी राजू जांभूळकर यांनी केलेली आहे.