रामटेक – राजू कापसे
रामटेक येथील कार्तिक पौर्णिमेनिमित्त गडमंदिरावरून दर्शन करून परतत असताना दोन युवकांना होमगार्डने बेदम मारहाण केली होती.या मध्ये विवेक विश्वनाथ खोब्रागडे (२१, रा. सीतापूर पवनी), या युवकाचा उपचाराला नेताना मृत्यू झाला होता.फैजान यासीन पठाण (१९) हा गंभीर जखमी होता. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
होमगार्ड मनीष भारती, जितेंद्र गजेंद्र गिरी (२५) व सतेंद्र गजेंद्र गिरी (२३), रा. तिघेही अंबाडा वॉर्ड, रामटेक, अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेची दखल स्वतः पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घेत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळ गाठले. घटनेच्या वेळी अपघातग्रस्त आरोपीची दुचाकी व मृतकाच्या वाहनाचे निरीक्षण केले व आरोपीविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन दिले.
दरम्यान, मृतकाच्या कुटुंबीयांनी आपली व्यथा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासमोर मांडली. आपल्या मुलाला लवकरात लवकर न्याय मिळवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी कुटूंबातील सदस्यनी केली. यावेळी मृतकाच्या कुटुंबीयाने आरोप केला की,आमच्या मुलाचा कुठलाही गुन्हा नसताना जिवानिशी मारले व जातिवाचक शिवीगाळ केली.
याउलट जबरदस्ती करून १० हजार रुपये लुटले.गडमंदिरावर दर्शन घेणे चुकीचे आहे का असा प्रश्न उपस्थित केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.