Thursday, September 12, 2024
spot_img
Homeराज्यव्हॉईस ऑफ मीडियाच्या अधिवेशनाची यशस्वी सांगता, अडीच हजारांहून अधिक पत्रकारांनी नोंदवला सहभाग...

व्हॉईस ऑफ मीडियाच्या अधिवेशनाची यशस्वी सांगता, अडीच हजारांहून अधिक पत्रकारांनी नोंदवला सहभाग…

दोन दिवस चर्चासत्र, परिसंवाद, ठरावाने झाली सांगता. आता पुढच्या अधिवेशनाची उत्सुकता.

शिर्डी – राजू कापसे

महाराष्ट्रातल्या २० संपादकांनी सुरू केलेल्या आणि जगभरामध्ये ४३ देशांपर्यंत आपल्या कृतिशील कार्यक्रमांच्या माध्यमातून पोहोचलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य शिखर अधिवेशन महाराष्ट्रमधल्या शिर्डी येथे पार पडले. दोन दिवस या अधिवेशनामध्ये राज्यभरातून अडीच हजारहून अधिक पदाधिकारी,पत्रकार सहभागी झाले होते.

चर्चा, परिसंवाद,ठराव शासनासंदर्भातले धोरण, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटना, संस्थेची वाटचाल आदी विषयांवर दोन दिवस विचारमंथन झाले. पत्रकारिता, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी या अधिवेशनात आपला सहभाग नोंदवला होता. आता पुढच्या वर्षीचे अधिवेशन कुठे असणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

अवघ्या चार वर्षांत आपल्या कृतिशील कार्यक्रमातून जगभरातल्या पत्रकारांना आकर्षित करणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राज्य शिखर अधिवेशन शिर्डी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. पत्रकारांचे घर, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, स्कीलिंग, सेवानिवृत्तीनंतर असणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न सोडवले जावेत. या पंचसूत्रीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ काम करते.

या पंचसूत्रीला घेऊन या अधिवेशनामध्ये विचार मंथन घडवून आणण्याचे काम पार पडले. सी. पी. राधाकृष्णन राज्यपाल, नीलमताई गोरे उपसभापती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या होत्या. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा अध्यक्ष संदीप काळे यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरची संघटनेची भूमिका विशद केली.

वर्षभरामध्ये राज्यात आंदोलन, प्रशिक्षण यासंदर्भातली भूमिका प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी मांडली. राज्य कार्याध्यक्ष तथा मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर, उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष तथा निमंत्रक गोरक्षनाथ मदने यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करत सहभागी पत्रकारांचे आभार मानले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून शासन दरबारी पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी सतत पाठपुरावा सुरू आहे.

यासाठी संघटनेने अनेक आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आंदोलनाची दखल घेत शासनाने पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. मात्र अद्याप हे महामंडळ कार्यान्वित केलेले नाही. हे महामंडळ शासनाने तातडीने स्थापन करून तात्काळ कार्यान्वित करावे. असे अनेक ठराव यावेळी घेण्यात आले. ठरावाचे वाचन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी केले.

अधिवेशनातील ठराव.

पत्रकारांसाठी जाहीर केलेले स्वतंत्र कल्याणकारी मंडळ त्वरित कार्यान्वित करावे.१० वर्ष पूर्ण झालेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्विकृती कार्ड व पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे. दहा वर्ष पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार व त्यांच्या कुटुंबाला आरोग्य विमा व विनामूल्य उपचार उपलब्ध करून द्यावेत. पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोटा ठरविण्यात यावा.

प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार गृहनिर्माण वसाहत निर्माण करावी.शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकार संशोधन केंद्राला मान्यता घ्यावी. महामंडळास २०० कोटी रुपये द्यावेत. शासनाद्वारे दैनिक आणि साप्ताहिकांना देण्यात येणाऱ्या जाहिरातींचे समान धोरण ठरविण्यात यावे. शासन स्तरावर पत्रकार सन्मान योजना राबविण्यात येऊन ज्येष्ठ पत्रकारांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे, असे ठराव यावेळी करण्यात आले.

दोन दिवस अधिवेशनामध्ये सहभागी झालेले मान्यवर…

रक्षा खडसे- केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील- महसूल मंत्री, आ. बाळासाहेब थोरात, प्रमोद कांबळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार चित्रकार, भाऊ तोरसेकर ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, लेखक, अशोक वानखेडे ज्येष्ठ पत्रकार, लेखक, तुळशीदास भोईटे, संपादक पुढारी, सरिता कौशिक संपादक एबीपी माझा,

हेमंत पाटील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र महाराष्ट्राचे अध्यक्ष, आ. सत्यजित तांबे, ओमप्रकाश शेटे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती प्रमुख, रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख आरोग्य निधी मंत्रालय, प्रसन्न जोशी, न्यूज एडिटर पुढारी, प्रकाश पोहरे संपादक दैनिक देशोन्नती तथा ज्येष्ठ लेखक,

राजश्री पाटील अध्यक्ष गोदावरी समूह मुंबई, प्रीतम मुंडे माजी खासदार, रविकांत तुपकर शेतकरी नेते, गोरक्षनाथ गाडीलकर विशेष कार्यकारी अधिकारी, श्री साई संस्थान, शिर्डी, संजय इंगळे सहसचिव महसूल मंत्रालय,राणा सूर्यवंशी उद्योजक,बाळासाहेब पानसरे वृक्षमित्र,व्यंकटेश जोशी समाजसेवक.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: