या कारवाईमध्ये क्लर्क आणि वकीलही सहभागी…ऍन्टी करप्शन ब्यूरोची धडाकेबाज कारवाई
बुलडाणा, २८ डिसेंबर – पद आणि लाचेची रक्कम बघता ही यावर्षातील सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल. सुमारे एक लाख स्वीकारतांना भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. या लाच प्रकरणात लिपीक नागोराव खरात यालाही ताब्यात घेण्यात आले असून धक्कादायक बाब म्हणजे मोताळा येथील वकील अनंत देशमुख यांच्यामार्फत ही लाच स्वीकारण्यात आली. सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात हा सापळा यशस्वी झाला.
प्रकरण भूसंपादनाला घेऊन आहे. जिगॉंव प्रकल्पामध्ये हिंगणे इच्छापूर येथील एका शेतकरी तक्रारदाराच्या वडीलांची जमीन भूसंपादीत करण्यात आलेली आहे. दीड एकरच्या या जमीनीचा मोबदला सरकारकडून जमा झाला. दरम्यान तक्रारदाराचे वडील मयत पावले आणि मोबदल्याची रक्कम तक्रारदाराच्या चुलत्याच्या खात्यावर जमा झाली. अर्थात ही चूक भूसंपादन विभागाची होती. तक्रारकर्त्याच्या वडीलांचे नांव ‘रविंद्र’ होते आणि चुलत्याचे ‘राजेंद्र’.. रविंद्रच्या ऐवजी राजेंद्र झाल्यामुळे रक्कम तक्रारकर्त्याला मिळत नव्हती. जी चूक भूसंपादन विभागाने केली,त्याच्याच दुरुस्तीचे तक्रारदार शेतकर्याकडून एक लाख रुपये लाचेच्या स्वरुपात उपजिल्हाधिकारी घुगे यांनी मागितले. लिपीकामार्फत ही रक्कम वकील अनंत देशमुख यांना देण्याचे ठरले.
तक्रारदाराने इकडे भ्रष्टाचार विरोधी प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास एक लाख रुपये घेवून तक्रारदार शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात पोहोचला. वकील अनंत देशमुख आणि लिपीक नागोराव खरात यांनी रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने उपजिल्हाधिकारी घुगे, लिपीक खरात आणि वकील देशमुख या तिघांनाही पकडले. तिन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही धडाकेबाज कारवाई वाशिम येथील डीवायएसपी श्री गजानन शेळके, पीआय भोसले, बुलडाणा विभागाचे पीआय सचिन इंगळे, एएसआय भांगे, हेकॉं साखरे, पोलीस नाईक लोखंडे, पवार, बैरागी आदिंनी यशस्वीरित्या पूर्ण केली. या कामगिरीबद्दल एसीबीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घुगे उस्मानाबादेतही लाच स्विकारतांना पकडले गेले होते
सन २०१४ मध्ये उस्मानाबाद येथे जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर कार्यरत असतांना भिकाजी घुगे यांना १२ हजार रुपयांची लाच स्विकारतांना उस्मानाबाद एसीबी पथकाने पकडले होते. याबाबत महत्वपूर्ण माहिती मिळाली की, एका बचतगटाला केरोसीनचा परवाना देण्यासाठी घुगे यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १२ हजार रुपयांत काम करण्याचे ठरले होते. लिपीक विजय अंकुशे याने ही रक्कम स्विकारली होती. तेव्हा सापळा रचून बसलेल्या एसीबीपथकाने घुगेंना चतुर्भुज केले होते. घुगे हे लाच स्विकारण्यात ‘हॅबीच्युअल’ असल्याचे स्पष्ट होत आहे. उपजिल्हाधिकारी पदावरील अधिकार्याला दोनदा लाच स्विकारतांना पकडले जाते, ही बाब चिंतनीय आहे. त्यामुळे जे अधिकारी दोनदा लाच स्विकारतांना पकडले जातील, त्यांना पदावनत किंवा कामावरून काढण्याचा कायदा केला जावा, असाही विचार पुढे गेला पाहीजे.