सांगली – ज्योती मोरे
सांगली शिक्षण संस्थेच्या श्री. म. के.आठवले विनय मंदिरमध्ये आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सुमारे आठ हजार रुपयांची पुस्तके भेट दिली. वाचन प्रेरणा दिनानिमित्त,माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुस्तक वाचन उपक्रम राबवण्यात आला.
मुख्याध्यापक राजाराम व्हनखंडे यांच्या हस्ते कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक स्नेहल गौंडाजे यांनी केले, त्यांनी वाचन प्रेरणा दिन, हात धुणे दिन, विद्यार्थी दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन याबाबतची माहिती दिली. सौ. वर्षा चौगुले यांनी कथेच्या माध्यमातून वाचन किती महत्त्वाचे आहे याविषयी विवेचन केले.
सौ. अपर्णा कुलकर्णी यांनी हात जुने दिवसाबाबत माहिती देऊन हात धुणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे, असे सांगितले. इयत्ता तिसरी ब मधील शर्वरी अमोल माने या विद्यार्थिनीने हात धुण्यासंदर्भातील कृतीगीत सादर केले. मुख्याध्यापक राजाराम व्हनखंडे यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले. यानिमित्ताने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आठ हजार रुपये किमतीची सुमारे 500 हून अधिक बाल साहित्य विषयक पुस्तके शाळेला भेट स्वरूपात दिली.
त्याबद्दल विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. पर्यवेक्षक नानासाहेब खाडे यांनी आभार मानले.दुपार सत्रातही स्नेहल गौंडाजे यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विषयी पहिली – दुसरीच्या विद्यार्थ्याना माहिती सांगितली. इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनीही सामुदायिकपणे गोष्टींचे वाचन केले.
पर्यवेक्षिका सौ. नंदिनी सपकाळ व सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते. सांगली तील श्री. म.के. आठवले विनय मंदिरमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मुख्याध्यापक राजाराम व्हनखंडे. शेजारी नानासाहेब खाडे, स्नेहल गौंडाजे व इतर शिक्षक उपस्थित होते.