कोगनोळी – राहुल मेस्त्री
कोगनोळी ता.निपाणी येथील शहाजी पाटील यांच्या पत्नी कुसुम पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या घरातील कपडे व अन्य साहित्य धुण्यासाठी परीट समाजातील शानाबाई परीट यांच्याकडे दिले होते. नजरचुकीने निधन झालेल्या कुसुम पाटील यांचे हातातील चार तोळ्याचे बिलवर त्या कपड्यामध्येच राहिले होते.
कपडे व साहित्य घेऊन येथील अंबिका तलावावर शानाबाई परीट गेले असता त्यांच्या निदर्शनास आले. तात्काळ त्यांनी शहाजी पाटील यांच्या घरी येऊन सोन्याचे बिलवर कपड्यामध्ये असल्याचे सांगुण सदर सोन्याचा दस्तावेज आणि बिल परत केले.या प्रामाणिकपणामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात होते.
तर इतकेच नाही तर ही बातमी प्रसारमाध्यमामध्ये प्रकाशित झालेली पाहून बारवाड ता.निपाणी येथील हायस्कूलच्या सुमारे 30 विद्यार्थी – विद्यार्थ्यांनींनी शानाबाई परीट यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक पत्र लिहून केले आहे.सदर सर्व पत्रे पोस्टाव्दारे त्यांना पाठवण्यात आली आहेत.
आजच्या धक्काधक्कीच्या आणि धावपळीच्या युगात माणूस पैशाच्या मागे धावतो आहे. कोणत्याही मार्गाने पैसे मिळवण्यासाठी त्याची सतत धडपड सुरु असते. एकविसाव्या शतकात प्रामाणिकपणाची उदाहरणे क्वचित ऐकायला मिळतात.त्याचे ज्वलंत उदाहरण शानाबाई परीट या आहेत.