जिल्हा परिषदेत कामकाज ठप्प.
सर्व राजपत्रित अधिकारी सुद्धा सामूहिक रजेवर…
नागपूर – शरद नागदेवे
एकच मिशन जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रवाहाने लागू करावी या मागणीसाठी आज राज्य सरकारी कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेतर्फे राज्यव्यापी संप पुकारला. या संपास संमिश्र प्रतिसाद मिळाला. १३ डिसेंबर रोजी शासनासोबत कर्मचारी संघटनांची बोलणी फिस्कटल्यामुळे आज १४ डिसेंबर पासून कर्मचाऱ्यांनी संपाचा निर्णय घेतला.
कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेत सकाळी दहा वाजता पासून मुख्य प्रशासकीय इमारती समोरील प्रांगणात नारे निदर्शने करून परिसर दणाणून सोडला. यावेळी जिल्हा परिषदेच्या विविध कर्मचारी संघटनांनी सहभाग घेतला. यावेळी शेकडो
कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती विशेष म्हणजे महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग जास्त होता.
कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे व अधिकारी हे सामूहिक रजेवर असल्यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाल्याचा दावा कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ सोहन चवरे यांनी केला. कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख आणि गटविकास अधिकारी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिलनाथ कलोडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करून कर्मचाऱ्याच्या आंदोलनास अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याची घोषणा केली. कुही पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ. स्वप्निल मेश्राम यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना संबोधित केले व जोपर्यंत मागणी मान्य होत नाही अथवा विधानसभेत शासनातर्फे जुन्या पेन्शनची घोषणा होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कर्मचारी संघटनेच्या ज्या मागण्या केल्या त्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवा निवृत्तीचे वय ६० करणे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती पुन्हा सुरू करणे, केंद्र कर्मचाऱ्यांप्रमाणे वाहतूक भत्ता, शैक्षणिक व अन्य भत्ते लागू करणे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, नवीन शिक्षण धोरण रद्द करणे खाजगीकरण व कंत्राटीकरण रद्द करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.
आजच्या आंदोलनामध्ये जे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले त्याच्यामध्ये गोपीचंद कातूरे, डॉ. सोहन चवरे, वासुदेव वाकोडीकर, अरविंद मदने जयंत दंडारे, विजय बुरेवार, कविता बोंद्रे, प्रियंका देशमुख आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.