आकोट – संजय आठवले
गत दोन वर्षांपासून कार्यकारिणी विना प्रशासन व मुख्याधिकारी यांचे भरोशावर सुरू असलेला आकोट पालिका कारभार मनमानी पद्धतीने सुरू असून विद्यमान मुख्याधिकारी हे भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप प्रहार चे आकोट शहर अध्यक्ष यांनी केला आहे. मुख्याधिकारी यांची चौकशी होऊन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी अकोला यांचेकडे केली आहे.
प्रहाररचे आकोट शहर अध्यक्ष विशाल भगत यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन दिले आहे. आपल्या निवेदनात त्यांनी काही मुद्दे मांडून त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे कि, आकोट शहरातील टाकपुरा येथे महेश स्टोअर्स या इमारतीचे अवैध बांधकाम करण्यात आले आहे. त्याप्रकरणी चौकशी होऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष करून पालिका मुख्याधिकारी यांनी या अवैध बांधकामास अभय दिले आहे.
सद्यस्थितीत शहरातील कबुतरी मैदानात पेवर्स ब्लॉक्स बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र अतिशय महत्त्वाचे ठिकाणी हे काम होत असल्यावरही अतिशय दर्जाहीन पद्धतीने सुरू आहे. पालिका अभियंता गोतरकर व ठेलकर यांचे निदर्शनास ही बाब आणल्यावरही त्यांनी त्यावर कोणतीच कारवाई न करता उलट कंत्राटदाराचीच बाजू घेतली. आणि कंत्राटदाराबाबत जे काय बोलायचे ते मुख्याधिकारी यांचेशी बोला. त्यांचे आदेशाविना आम्ही काहीच करू शकत नाही. असे उत्तर दिले. महत्त्वाचे म्हणजे मुख्याधिकारी पालिकेत बहुतांश गैरहजरच असतात. त्यामुळे त्यावर कुणाकडे तक्रार करावी हा मोठा प्रश्न आहे.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पालिकेद्वारे होणाऱ्या कामांमध्ये स्वतः मुख्य अधिकारी व अभियंते यांची भागीदारी असल्याची सर्वत्र चर्चा आहे. कामांच्या पात्रता पूर्ण करीत नसल्यावरही अपात्र कंत्राटदारांना मोठमोठी कामे देण्यात येत आहेत. या संदर्भात केलेल्या तक्रारीची दखलद घेतली जात नाही. उलट कंत्राटदारांविरुद्ध तक्रारी करू नका. असा दम मुख्याधिकारी व अभियंता तक्रारकर्त्याला देतात. त्यामुळे या कामांमध्ये पालिका प्रशासनाची हिस्सेदारी असल्याच्या चर्चेत दम असल्याचा पुरावा मिळतो.
अशा पद्धतीने अतिशय मनमानी व भ्रष्टाचार युक्त कारभार होत असल्याने शासकीय निधी व पालिकेच्या निधीचा चुराडा होत आहे. तो थांबविणेकरिता या मुद्द्यांची सखोल चौकशी करण्यात येऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी प्रहार चे आकोट शहर अध्यक्ष विशाल भगत यांनी केली आहे.