सांगली – ज्योती मोरे
चोरी केलेली मोटरसायकल विकण्याच्या उद्देशाने थांबलेल्या दोघा विधीसंघर्ष बालकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील वीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर गाडी जप्त केली आहे.
सध्या सांगली शहरासह जिल्ह्यात मोटरसायकलच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असल्याने याबाबत गुन्हे उघड करून त्यांच्यावर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले असल्याने, वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून पेट्रोलिंग करत असताना संकेत कानडे आणि ऋषिकेश सदामते यांना दोघेजण सांगलीतील हिंदू मुस्लिम चौकात स्प्लेंडर गाडीसाठी ग्राहक शोधत थांबले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, हे दोघेही अल्पवयीन असल्याचे लक्षात आले.अधिक चौकशी केली असता, सदरची गाडी ही कवठेपिरान गावच्या पेठ भागातून पहाटेच्या सुमारास चोरली असल्याचे त्यांनी कबूल केले आहे.त्यांच्या जवळील मोटारसायकलीसह या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून ,पुढील तपास कामासाठी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम ,अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, सुनील चौधरी, हेमंत ओमासे, संदीप पाटील, संकेत कानडे, चेतन महाजन, कुबेर खोत, रुपेश होळकर, विनायक सुतार, ऋषिकेश सदामते, प्रशांत माळी आर्यन देशिंगकर यांनी केली आहे