आकोट – संजय आठवले
गांधीग्राम येथील खचलेल्या पुलामुळे बंद करण्यात आलेली वाहतूक पूर्णतः सुरू करण्यात आलेली नसली तरी, अकोला ते गांधीग्राम व गांधीग्राम ते अकोला आणि आकोट ते गांधीग्राम व गांधीग्राम ते आकोट अशा सलग बसफेऱ्या सुरू करण्यास राज्य परिवहन महामंडळाने हिरवा कंदील दिल्याने ऐन दिवाळी सणात आकोटकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मात्र रुग्णवाहिका, खाजगी वाहने आणि मालवाहतूकदारांची अडचण मात्र कायम असून त्यांना लांबच्या पर्यायी मार्गाचाच वापर करावा लागणार आहे. तर ह्या बस फेऱ्या सुरू होणार असल्याने गांधीग्रामच्या गुळपट्टीवरील संकट दूर होऊन तिला पुन्हा अच्छे दिन प्राप्त झाले आहेत.
अकोला आकोट हा मार्ग वाहतुकीस बंद झाल्याने आकोटकर प्रवाशांना मोठी अडचण निर्माण झाली होती. प्रशासनाने निर्धारित केलेला पर्यायी मार्ग हा वेळकाढू व खर्चिक असल्याने सामान्य प्रवासी अतिशय क्रोधित झालेले होते. त्यातच ही अडचण चार आठ दिवसात निस्तरण्याजोगी नसल्याने आणि पूल दुरुस्तीच्या कालावधीची कोणतीच शाश्वती नसल्याने प्रवासी वर्गात काहूर माजलेले होते.
त्यातच या मार्गाच्या वाहतुकीवर अवलंबून असलेल्या रोजगारांवरही वरवंटा फिरविल्या जाणार असल्याने अनेक लोकही बेरोजगार होणार होते. त्यामुळे आकोट अकोला प्रवासी वाहतुकीबाबत तोडगा काढण्याची बाब प्रशासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार परिवहन महामंडळाने त्यावर तोडगा काढला आहे.
त्या तोडग्यानुसार अकोला गांधीग्राम व गांधीग्राम अकोला अशा सलग २० बस फेऱ्या आणि आकोट गांधीग्राम व गांधीग्राम आकोट अशा सलग २४ बस फेऱ्या सुरु करण्यास मंजुरात देण्यात आली आहे. आकोटकडील बस फेऱ्यांचे नियोजन आकोट आगाराने तर अकोला कडील बस फेऱ्यांचे नियोजन अकोला आगाराने करावयाचे आहे. असा आदेश विभाग नियंत्रक राज्य परिवहन अकोला यांनी दिनांक २०.१०.२०२२ रोजी जारी केला आहे.
त्याकरिता आकोट आगाराला गांधीग्राम पूलाच्या आकोटकडील बाजूने पानेटजवळ प्रवासी थांबा निर्माण करावा लागणार आहे. जेणेकरून आकोटहून आलेले प्रवासी तेथे उतरतील आणि पायदळ पूल पार करून गांधीग्रामच्या थांब्यावर जातील. त्याचप्रमाणे अकोला आगाराला गांधीग्राम या गावात प्रवासी बस थांबा निर्माण करावा लागणार आहे. जेणेकरून अकोल्याहून आलेले प्रवासी या थांब्यावर उतरतील आणि पायदळ पूल पार करून आकोटकडील बस थांब्या पर्यंत जातील.
या पुलावरून जाण्यास वाहनांना मनाई करण्यात आली असली तरी, परिवहन महामंडळाने केलेल्या या सोयीसाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी या पुलावरून वाटसरूंना पायी जाण्याची अनुमती दिलेली आहे. त्यानुसार अकोला आणि आकोट आगारातून पहाटे ६ वाजता पासून या बस फेऱ्या सुरू होणार आहेत.
आकोट ते गांधीग्राम ही शेवटची बस फेरी सायंकाळी ५.३० वाजता तर गांधीग्राम ते आकोट ही अंतिम बस फेरी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. त्यामुळे सायंकाळी अकोला येथून आकोट येथे येणाऱ्यांना सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत गांधीग्राम येथे हजर राहावे लागणार आहे. त्याचप्रमाणे अकोला गांधीग्राम ही अंतिम बस फेरी रात्री ८.०० वाजता तर गांधीग्राम ते अकोला ही अंतिम बस फेरी रात्री ८.४५ वाजता होणार आहे. त्यामुळे आकोट येथून अकोला येथे जाणाऱ्यांना गांधीग्राम येथे रात्री ८.४५ वाजता हजर असणे अनिवार्य राहणार आहे.
मात्र अकोला आकोट अशी अखंड वाहतूक शक्य नसल्याने रुग्णवाहिका, मालवाहतूकदार आणि खाजगी वाहने यांना या सोयीचा कोणताही लाभ होणार नाही. त्यांना प्रशासनाद्वारे निर्धारित अथवा अकोला आकोट अशा अन्य अखंड मार्गानेच वाहतूक करावी लागणार आहे.
या आदेशाने गुळपट्टीचे दैन्य दूर
अकोला आकोट या मार्गावरील वाहतूक बंद झाल्यामुळे गांधीग्राम येथील सुप्रसिद्ध गुळपट्टी उद्योगाला मोठा फटका बसणार होता. परंतु आता दोन टप्प्यात का होईना या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे गांधीग्राम येथे वर्दळ आणि प्रवाशांचा राबता पूर्ववत राहणार आहे. परिणामी गांधीग्राम येथील चविष्ट गुळपट्टी खवैय्या प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहणार आहे. त्यामुळे गांधीग्राम येथील गुळपट्टीचे दुर्दिन येता येताच तिचे सुदिन सुरु होणार असल्याचे दिसत आहे.
विभाग नियंत्रक अकोला यांनी वाहतुकीच्या या आदेशासह बस फेऱ्यांचा नियोजन आराखडा ही घोषित केला आहे. हा घोषित आराखडा संबंधित आगारांना पाठवून त्यानुसार बस फेऱ्यांचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बसफेऱ्यांचे ते वेळापत्रक येणेप्रमाणे