Friday, September 20, 2024
Homeमनोरंजनपांचगणीत रंगले राज्यस्तरीय मायमराठी कविसंमेलन..!

पांचगणीत रंगले राज्यस्तरीय मायमराठी कविसंमेलन..!

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर साहेब यांच्या हस्ते पुरस्कार सोहळा संपन्न.

पाचगणी :- “कविता : तुझी आणि माझी!” या प्रख्यात समुहातर्फे राज्यस्तरीय कविसंमेलनाचे दिमाखदार आयोजन स्वागताध्यक्ष ज्ञानेश सूर्यवंशी आणि सचिव छाया सीमा खंडागळे यांनी केले. प्रसिद्ध कविवर्य श्री. अरुण दादा म्हात्रे यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून यथोचित आणि साजेसा पदभार स्वीकारला.

कविसंमेलनाच्या सांगता सोहळ्याला महाराष्ट्राचे शालेय शिक्षण व मराठी भाषा संवर्धन मंत्री सन्माननीय श्री दीपकजी केसरकर यांची उपस्थिती वैशिष्ठ्यपूर्ण ठरली. सदर संमेलनास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साडे तीनशे पेक्षा जास्त कवी आणि कवयित्री यांनी हजेरी लावली.

आबुधाबी, मलेशिया, व्हिएतनाम या देशातून सुद्धा काही कवींनी हजेरी लावली. संमेलनातील विविध सत्रांतील अध्यक्षपद कविवर्य उद्धव कानडे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, कविवर्य हनुमंत चांदगुडे, कविवर्य चंद्रकांत दादा वानखेडे, कविवर्य संतोष घुले, कवी श्रीकांत पाटील आणि संमेलनाध्यक्ष अरुण दादा म्हात्रे यांनी भूषविले.

याशिवाय सदर संमेलनामध्ये मेघराज राजेभोसले, अध्यक्ष अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, चित्रपट निर्माते गौतम सातदिवे, पाचगणीचे मुख्याधिकारी मा. गिरीश दापकेकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे माजी उपमहापौर केशवदादा घोळवे, गटशिक्षणाधिकारी श्री आनंद पळसे आणि भिलार येथील सन्माननीय व्यक्तिमत्त्व श्री शांताराम बापू भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सन्माननीय श्री. दीपकजी केसरकर म्हणाले की, मराठी माणूस हा आपल्या भाषेवर व लोकांवर अपार प्रेम करतो. हेच त्याचे प्रेम मराठी साहित्यामध्ये प्रतित होते. पुढे केसरकर जी म्हणाले, “महाविद्यालयीन जीवनात मला कविवर्य डॉक्टर वसंत सावंत यांच्याकडून मराठी विषय शिकण्याची संधी मिळाली. पुढे वसंत सावंत यांच्या कवितांच्या माझ्या सामाजिक जीवनात ही खूप मोठा प्रभाव राहिला.”

या सोहळ्यात सन्माननीय दीपकजी केसरकर यांच्या हस्ते कवी हनुमंत चांदगुडे यांना काव्यजीवन गौरव पुरस्कार, कवी संतोष जगताप यांना काव्यरत्न पुरस्कार, कवी संपत गर्जे यांना काव्य प्रदीप पुरस्कार व कवी शंतनु गुणे यांना कुसुमाग्रज गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या देखण्या सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री विठ्ठल माने आणि कवयित्री समृद्धी सुर्वे यांनी केले. संमेलनाध्यक्ष अरुण दादा म्हात्रे यांच्या समारोप भाषणानंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व नितीनभाई भिलारे यांनी आभारप्रदर्शन केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: