जागतिक बांबू दिनानित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन…
शरद नागदेवे
नागपूर – महाराष्ट्राला हिरवेगार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. शेतक-यांमध्येदेखील बांबू लागवडीबाबत जागृती करण्यात येत आहे. संशोधन, प्रशिक्षण, विविध कलात्मक वस्तूंची निर्मिती, विक्री अशा अनेक आघाड्यांवर महाराष्ट्र सरकार बांबू क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करीत आहे, असे प्रतिपादन प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख ) श्री वायएलपी राव भा.व.से यांनी केले.
महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, बांबू सोसायटी ऑफ इंडिया, विदर्भ चॅप्टर, वनराई फाउंडेशन व रोटरी इलीट यांच्या संयुक्त वतीने शनिवारी जागतिक बांबू दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बाबुराव धनवटे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख ) श्री वायएलपी राव भा.व.से प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी वनराई फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी होते.
मंचावर महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवासा राव यांच्यासह बांबू सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र चॅप्टरचे माजी अध्यक्ष आर्किटेक्ट सुनील जोशी सुनील जोशी, बिंग स्टुडिओच्या संस्थापक प्रियंका खंडेलवाल प्रियंका खंडेलवाल, बांबू सोसायटी आफ इंडिया विदर्भ केंद्राचे नवनियुक्त अध्यक्ष अजय पाटील, रोटरी इलिटचे अध्यक्ष शुभंकर पाटील, वनराईचे निलेश खांडेकर यांची उपस्थिती होती.
श्रीनिवासा राव यांनी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाद्वारे सुरू असलेल्या विविध प्रयत्नांचा आढावा घेतला. बांबूवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून नवनवीन जाती निर्माण करण्याचे काम सुरू आहे. बांबूबद्दलेच गैरसमज, उपयोग इत्यादीसंदर्भात माहितीपुस्तिका प्रकाशित करून त्याबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महाराष्ट्रातील कारागिरांना एकत्र करून त्यांनी तयार केलेली बांबूची विविध उत्पादने विकण्यासाठी ई-मार्केटिंगची स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याची योजना आहे. ग्रामीण, आदिवासी भागातील लोकांसाठी बुरुड येथे कॉमन फॅसिलिटी सेंटर सुरू करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. गिरीश गांधी यांनी अजय पाटील यांचे बांबू सोसायटी आफ इंडिया विदर्भ केंद्राच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. बांबू हे पर्यायी पीक म्हणून शेतक-यांच्या जीवनात आल्यास त्यांच्या स्थितीत आमूलाग्र बदल होईल, असे ते म्हणाले. प्रास्ताविकातून शुभंकर पाटील यांनी बांबूचा ‘ग्रीन गोल्ड’ असा उल्लेख केला. बांबूच्या विकासासाठी सरकार, संस्था, समाजाने एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना अजय पाटील यांनी शेतकरी बांधवांना जोडधंदा मिळावा, त्यांना मदत व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले असल्याचे सांगितले. सोसायटीची महिन्यातून दोनदा बैठक घेऊन बांबूसंदर्भात समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला विजय जावंधिया यांच्यासह आशिष नागपूरकर, आशिष कासवा, गणेश हरिमकर, वैभव काळे, राजपाल, विजय घुगे, उमेश निनाने हे बांबू सोसायटी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉ. विजय इल्लोरकर यांनी केले.