२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीनुसार उपाययोजना करण्यात येत आहेत…
पनवेल – किरण बाथम
आज रेड अलर्ट असला तरी उद्या हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे पाऊस कमी होईल.मात्र तरीही एनडीआरएफच्या टीम, स्थानिक रेस्क्यू टीम तैनात ठेवण्यात आल्या आहेत.
रेस्क्यू करण्याची वेळ जरी आली तरी रेस्क्यू व एनडीआरएफची टीम तैनात आहे असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आणि रायगड जिल्हयाच्या माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी रायगडवासियांना दिला आहे.
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या शक्यतेनुसार मंगळवारीच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील तहसीलदार व प्रांत कार्यालयाकडून माहिती दिली जात आहे. २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यापरिस्थितीनुसार ज्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे उपाययोजना इथे केल्या जात आहेत. आम्ही वेळोवेळी नागरीकांशी, यंत्रणेच्या संपर्कात आहोत असेही अदिती तटकरे यांनी सांगितले.
पोलादपूरपासून महाबळेश्वर घाट रस्ता वाहतूकीसाठी बंद आहे. ज्या पुलावरून पाणी जात आहे त्यामध्ये म्हसळा, माणगाव, महाड, अलीबाग, पेण, उरण येथील रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहे. आम्ही सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असेही अदिती तटकरे यांनी सांगितले.