Saturday, December 21, 2024
Homeराज्यव्हॉईस ऑफ मीडियाचे ३१ रोजी शिर्डीत राज्य अधिवेशन; हजारो पत्रकारांची उपस्थिती...

व्हॉईस ऑफ मीडियाचे ३१ रोजी शिर्डीत राज्य अधिवेशन; हजारो पत्रकारांची उपस्थिती…

रामटेक – राजू कापसे

जगात ३ लाख ७० हजार सदस्य संख्या असलेल्या आणि देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन शिर्डी येथे ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होत आहे. या निमित्त राज्यातील हजारो पत्रकारांचा मेळा साईबांबाच्या नगरीत भरणार आहे. या अधिवेशनात पत्रकारांच्या प्रलंबित समस्या, प्रश्नांवर चर्चा, ठराव होणार आहेत. त्याचबरोबर दोन दिवसांत पत्रकारांसाठी विविध चर्चासत्रे, बौध्दिक व सांस्कृतिक मेजवानीचेही आयोजनही करण्यात आले आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या अधिवेशनाचे पहिले सत्र ३१ रोजी सकाळी ९ वाजता सुरु होणार आहे. यावेळी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा परिचय, आमची भूमिका, कार्य व जबाबदारी तसेच संघटनेच्या सरदारांची कामगिरी सांगितली जाणार आहे.

दुसऱ्या सत्रात सकाळी ११ वाजता अधिवेशनाचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार सत्यजित तांबे, माजी खासदार हेमंत पाटील, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक संजय मालपाणी,

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती हेमलता अरुण शितोळे पाटील व भाजप युवा मोर्चाचे विक्रम पाचपुते हे प्रमुख अतिथी असणार आहेत. यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘ व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे.

यावेळी ‘ व्हॉईस ऑफ मीडिया जीवन गौरव पुरस्कार २०२४ ‘चे वितरण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार, चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. यंदा विजय बाविस्कर, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, अशोक वानखेडे, तुळशीदास भोईटे व सरिता कौशिक हे या पुरस्काराचे मानकरी आहेत.

अधिवेशनाचा समारोप दि. १ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता होणार आहे. यावेळी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कॉग्रेसचे विधीमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात, आ. लहू कानडे, आ. क्षितिज ठाकूर, शेतकरी नेते रविकांत तुपकर, साईबाबा विश्वस्त संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते व्हॉईस ऑफ मीडियात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांचा पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे.

या अधिवेशनात दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पत्रकारांना ही एक पर्वणी ठरणार आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे केवळ राज्यातील नव्हे तर देशातील आणि आंतरराष्ट्रीय पदाधिकारीही या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत.

भारतातील सर्व राज्याचे प्रदेशाध्यक्ष तसेच नेपाळ, स्पेन, अफगाणिस्तान यासह विविध देशातील निमंत्रित सदस्य अधिवेशनास येणार आहेत. राज्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी मोठ्या संख्येने या अधिवेशनाला उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी केले आहे.

विविध चर्चासत्रांचे आयोजन

  • दि. ३१ ऑगस्ट – पहिले सत्र – संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा परिचय, दुसरे सत्र – उद्घाटन समारंभ व जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण, तिसरे सत्र पुरस्कार प्राप्त संपादकांची प्रकट मुलाखत, चौथे सत्र – आम्ही घेतोय पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी ( चर्चासत्र, सत्कार समारंभ), पाचवे सत्र – माझा जिल्हा माझे व्हिजन ( जिल्हाध्यक्षांचे चर्चासत्र ), अधिवेशन घेण्यामागची भूमिका…(चर्चासत्र ), रात्री – सांस्कृतिक कार्यक्रम
  • दि. १ सप्टेंबर – पहिले सत्र – ठराव वाचन, दुसरे सत्र – पत्रकार व पत्रकारिता वाचवण्यासाठी आम्हा पत्रकारांचे योगदान काय असणार ( प्रकट मुलाखत ), तिसरे सत्र – संविधान वाचवण्यासाठी महिलांचा सहभाग का आवश्यक ? (चर्चासत्र ), समारोप सत्र – संघटनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान.
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: