Friday, November 22, 2024
Homeराज्यराज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीस प्रारंभ...

राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीस प्रारंभ…

लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्णजिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती – दुर्वास रोकडे

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. प्रशासन आणि नागरिकांमधील पत्रकार हा महत्त्वाचा दुवा असून प्रशासनामधील उणिवा दर्शविणे तसेच नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांच्यामार्फत होत असते. लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी पत्रकाराची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या पाचव्या बैठकीच्या कामकाजास येथील दि प्राईम पार्क रिसोर्टच्या सभागृहात आमदार सुलभाताई खोडके, संजय खोडके, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदुनाथ जोशी होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)(प्रशासन) तथा समितीचे सदस्य सचिव हेमराज बागुल, अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष रवीद्र लाखोडे, सदस्य जयराम आहुजा, उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर तसेच राज्य अधिस्वीकृती समितीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, शासनाच्या विविध लोकहितकारी निर्णय व योजनांची प्रशासनाकडून प्रभावी अंमलबाजवणी करताना प्रसारमाध्यमांसोबत समन्वय ही महत्त्वाची बाब आहे. नि:पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासनातील उणिवा दूर होऊन संबंधितांना न्याय मिळवून दिला जाऊ शकतो. तसेच विकासात्मक कामे पूर्ण होण्यासाठी सहाय्यता होते, असे त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त श्री. रेड्डी यांनी पोलीस प्रशासनातील कारकीर्दीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबतच्या सौहार्दपूर्ण संवादाचे अनुभव कथन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना वृत्तपत्रातील माहिती ही अत्यंत उपयुक्त ठरते. घटना व प्रसंगा संबंधीची सत्य माहिती वृत्तपत्रातून मिळत असते. त्यामुळे करिअरच्या दृष्टीकोनातून माध्यमांचे महत्व अधोरेखित होते. पत्रकारांजवळ लेखणीचे शस्त्र असून त्याचा सुयोग्य उपयोग व्हावा. राज्य अधिस्वीकृती समितीने पात्र व योग्य पत्रकारास अधिस्वीकृती पत्रिका देणे व त्याचा सुयोग्य वापर व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय संबोधनात यदूनाथ जोशी म्हणाले, अमरावती ही संत व समाजसुधारकांची भूमी म्हणून सर्वदूर परीचित आहे. तसेच पत्रकारितेचीही दीर्घ परंपरा या जिल्ह्याला लाभलेली आहे. संत गाडगेबाबा, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची साधेपण व समाज प्रबोधनाची शिकवण अमरावतीकरांच्या प्रवृत्तीतून दिसून येते. राज्य अधिस्वीकृती समितीच्या कामकाजाबाबतची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच, अधिस्वीकृती पत्रिका योग्य पत्रकारांना‍ मिळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

हेमराज बागुल यांनी राज्य अधिस्वीकृती समितीच्या कामाकाज संदर्भातील माहिती प्रास्ताविकातून दिली. प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी सूत्रसंचालन केले तर उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर यांनी आभार मानले. अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य गोपाल हरणे, सुरेंद्र आकोडे यावेळी उपस्थित होते.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अमरावती विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने अधिस्वीकृती समितीच्या पाचव्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या समितीचे राज्याच्या विविध विभागातील सदस्य, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागाचे संचालक, उपसंचालक या बैठकीसाठी उपस्थित असून 28 जुलैपर्यंत ही बैठक चालणार आहे. 

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: