शरद पाटील झांबरे यांची एमपीएससी, पोलीस भरती, आरोग्य विभागासह इतर विभागाची रखडलेली भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी.
अकोला – राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न सध्या चांगलाच ऐरणीवर आला आहे. अनेक विभातील पदभरतीची प्रक्रिया रखडल्याने राज्यभरातील अनेक तरूण अक्षरश: मेटाकुटीस आले आहे. राज्यातील सर्वच खात्यातील भरती प्रक्रिया त्वरीत सुरू करण्याची मागणी विद्यार्थी, पदवीधरांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील झांबरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे केली आहे.
राज्यातील भरती प्रक्रिया रखडल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न सध्या टांगणीला लागला आहे. शरद पाटील झांबरे यांनी लिहिलेल्या पत्रात सरकारला सध्या राज्यभरातील विद्यार्थी आणि पदवीधरांच्या मनातील घालमेलीवर प्रकाशझोत टाकला आहे. एमपीएससी परिक्षेचा निकाल अद्याप लागलेला नाही.
यातूनच काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. भविष्यात महाराष्ट्राच्या प्रशासनाचं नेतृत्व करू पाहणाऱ्या तरूणाईच्या भविष्याशी सरकार का खेळू पाहते आहे?, असा सवालही झांबरे यांनी आपल्या पत्रातून सरकारला केला आहे. राज्यातील तलाठी, पोलीस भरतीसाठी सरकार कोणता मुहूर्त शोधत आहे.
या भरत्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून जीवापाड मेहनत करणाऱ्या युवकांना सरकार कधी न्याय देणार असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. यासोबतच आरोग्य विभागाच्या परिक्षेतील सावळा गोंधळ, त्यातून रखडलेला निकाल यामूळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांचं प्रमाण मोठं आहे. शेतकरी वर्ग आपल्या अडचणींतून मार्ग काढत आपल्या पाल्यांना शिकवतात. अभ्यास करून ते चांगली नोकरी करतील या स्वप्नांचा सरकारच्या वेळकाढू धोरणांमूळे अक्षरश: चुराडा झाल्याचं शरद पाटील झांबरे यांनी म्हटलं आहे.
राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत या प्रश्नामध्ये लक्ष घालून परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या नोकरीचा मार्ग सुकर करावा अशी मागणी झांबरे यांनी केली आहे. राज्यातील सर्वच भरती प्रक्रियांमधील ही लेटलतीफी त्वरीत थांबवावी. रखडलेली भरती प्रक्रिया त्वरीत सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, विद्यार्थ्याच्या रोषाला राज्य सरकारच कारणीभूत असेल असा इशाराही या पत्रातून झांबरे पाटील यांनी सरकारला दिला आहे.