मूर्तिजापूर
बंद असलेली नाफेड ची खरेदी तात्काळ सुरू करा अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्विकारण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश संघटक सचिव रविकुमार राठी यांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
काही दिवसांपासून राज्यात नाफेडची खरेदी बंद असून नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ १० टक्के शेतकऱ्यांच्या मालाची मोजणी झाल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. खुल्या बाजारात शेतकऱ्यांना हमी भाव सुद्धा मिळत नसल्या मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
अशा आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने नाफेड ची खरेदी तात्काळ सुरु करून शेतकऱ्यांचा माल हमी भावाने विकत घ्यावा. शेतकऱ्यांना अशा संकटकाळी मदतीचा हात देऊन नाफेडची खरेदी तात्काळ सुरू न केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल व त्याच्या परीणामांना शासन जबाबदार असेल,असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. याची प्रत कृषी मंत्र्यांनाही पाठविण्यात आली आहे.
रविकुमार राठी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात जिल्हा सरचिटणीस राजेंद्र मोहोड, अल्पसंख्याक नेते निजाम इंजिनिअर, तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे, शहराध्यक्ष राम कोरडे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विशाल शिरभाते, मुकेश अटल, रवि मार्कंड, राज तिवारी, संतोष चराटे, गजानन डहाळे, अभिषेक मेटकर,नौशाद यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.