सांगली – ज्योती मोरे
दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मिरजकरांसाठी शुभ बातमी दिली आहे. नागपूर – रत्नागिरी महामार्गावरील दिशा दर्शक फलकावर मिरज शहराच्या नावाचा उल्लेख करण्याचे आदेश प्राधिकरणाने डीबीएल कंपनीला दिले आहेत.
त्यामुळे मिरज सुधार समितीच्या पाठपुराव्याला यश आले आहे. राष्ट्रीय मार्गावरील दिशादर्शक फलकावरून मिरज शहराचे नावच गायब झाल्याने मिरज सुधार समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे.नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आला आहे.
अंकली फाट्यावर तसेच मिरज-पंढरपूर महामार्गावर प्राधिकरणाने दिशादर्शक फलक बसविले आहेत. मात्र, या फलकावरून मिरज शहराचे नाव गायब झाल्याने मिरज सुधार समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
तसेच, सुधार समितीने याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडे लेखी तक्रार केली होती. याची दखल घेत महामार्ग प्राधिकरणाने नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम करणाऱ्या डीबीएल कंपनीला मिरज शहराला जोडणाऱ्या महामार्गावरील दिशा दर्शक फलकावर मिरजेच्या नावाचा उल्लेख करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तांत्रिक विभागाचे उपव्यवस्थापक गोविंद भैरव यांनी दिले आहेत. तसे, पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मिरज सुधार समितीला दिले आहे.