अकोला – संतोषकुमार गवई
स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांगांच्या रोजगारासाठी संपूर्ण भारतभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.साऊ जिजाऊ महिला मंडळ गौरक्षण रोड, उर्वशी ब्युटी सलून व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या संयुक्त विद्यमाने दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजी आनंद उत्सव हा सामाजिक उपक्रम संपन्न झाला.सदर प्रदर्शनात दिव्यांगानी तयार केलेल्या पूजा किट, वाती, फुलवाती, अगरबत्ती, धूप, कापडी पिशवी, राखी, शोभिवंत वस्तू, आयुर्वेदिक साबण व फेस पॅक इत्यादी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होत्या.
या वस्तूंना गौरक्षण रोड परिसरातील महिलांनी खरेदी करून आनंद उत्सव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सारिका उगले यांनी अशा प्रदर्शनातून दिव्यांगांना सहकार्य करताना आम्हा सर्व महिलांना आनंद होत असल्याचे सांगितले. अकोल्यातील विविध ठिकाणी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे असे प्रदर्शन व रोजगाराभिमुख कार्यक्रम केले पाहिजे आणि अकोलेकरांनी संस्थेला आमंत्रित करून सहकार्य करावे असे मत त्यांनी व्यक्त केले .अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जिया खेतान यांनी ब्रेल पुस्तके देऊन संस्थेला सहकार्य केले. या उपक्रमातून मिळणारा निधी दिव्यांगांच्या शिक्षण,रोजगार व आरोग्यासाठी संस्थेकडून उपयोगात आणला जातो.
येणाऱ्या गणेशोत्सव, नवरात्र व दिवाळीमध्ये दिव्यांग रोजगारासाठी विविध उत्पादने बाजारात येणार असून अकोलेकरांनी ती खरेदी करून दिव्यांगांना रोजगार द्यावा ज्या दिव्यांगांना अशा उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा असे आव्हान विजय कोरडे यांनी केले.आनंद उत्सव उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सारीका उगले,जिया खेतान,नेहा पलन,कल्पना भाकरे,शारदा चिलात्रे, शिला त्रिकाणे, प्रिती शेगोकार, उज्वला हिंगणकर, माया पवार, माया आसोले,अर्चना इंगळे,अनुराधा साठे ,स्वाती वानखडे, प्रणाली शिंगाडे,कोल्हे,अनामिका देशपांडे व अस्मिता मिश्रा यांनी सहकार्य केले.