Sunday, December 22, 2024
Homeराज्यभरधाव कार ने पाणीपुरी हातठेल्याला उडवले, एक ठार, तिन जखमी...

भरधाव कार ने पाणीपुरी हातठेल्याला उडवले, एक ठार, तिन जखमी…

  • हातठेल्यासह मृतकाला ३० फुटापर्यंत नेले फरफटत
  • अनियंत्रीत कार पाणिपुरी हातठेल्याला उडवत गॅरेजमध्ये धडकली
  • राखी तलाव चौकातील भीषण अपघात
  • जखमीमध्ये दोन मेकॅनिकल तथा एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश

रामटेक – राजू कापसे

शहरापासुन मानापुर कडे गेलेल्या मार्गावर असलेल्या राखी तलाव चौक येथे गोंदिया कडून मनसर कडे भरधाव वेगाने जात असलेल्या कार ने विरुद्ध दिशेला झाडाखाली उभा असलेल्या पाणीपुरी हातठेल्याला जोरदार धडक दिली.

यात पाणीपुरी खाण्यासाठी उभा असलेल्या व्यक्तीचा मृत्यु तर गॅरेजमधील दोन मेकॅनिकल व व गाडी दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये आलेला पोलीस कर्मचारी हे जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की पाणीपुरी हात ठेल्यासह मृतकाला जवळपास 30 ते 35 फुटापर्यंत कार ने उडविले होते. आरोपी कार चालकाला अटक करण्यात आलेली आहे.

लखन शेखर भोसले वय 35 वर्ष राहणार अमानजपूर जिल्हा अकोला असे मृतकाचे नाव असून रवींद्र उदाराम मेश्राम वय 44 , धनंजय मनोहररावजी होळकर वय 48 , विशाल कडूजी कोडापे वय 27 वर्ष सर्व राहणार रामटेक तथा प्रगती अनिकेत चौके वय 27 वर्ष राहणार चिंचभवन नागपूर हे जखमी झालेले आहेत तर मुथ्थुकुमार रंगनाथन वय 56 राहणार एलआयसी क्वार्टर गोंदिया असे आरोपी कारचालकाचे नाव आहे.

पोलीस कर्मचारी तथा घटनास्थळावर उभे असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार एम एच 31 एफ आर 1115 क्रमांकाची फोर्ड कंपनीची कार गोंदिया कडून भरधाव वेगाने मनसरकडे जात होती दरम्यान बायपास रस्त्यावरील राखी तलाव चौकाजवळ आरोपीचे कार वरून नियंत्रण सुटले. काहीतरी समोर आले त्याच्यामुळे नियंत्रण सुटले असे आरोपीने सांगितले असल्याची माहिती पोलीस कर्मचाऱ्याने दिली.

तेव्हा कार वरून नियंत्रण सुटल्याने डाव्या बाजूने गोंदिया कडून येणारी आरोपीची कार उजव्या बाजूला असलेल्या पाणीपुरी हातठेल्याला व मृतकाला उडवत जवळपास 30 फूट अंतरावर असलेल्या गॅरेज मध्ये धडकली यात पाणीपुरी हात ठेला चालक तर सुखरूप बचावला मात्र येथे पाणीपुरी खाण्यासाठी उभा असलेला लखन शेखर भोसले वय 35 याचा जागेवरच मृत्यू झाला तथा गॅरेज मधील दोन मेकॅनिकल व गाडी दुरुस्तीसाठी गॅरेज मध्ये आलेला पोलीस कर्मचारी जखमी झाला.

घटनेनंतर या भीषण अपघाताला पाहण्यासाठी येथे जवळपास 500 च्या जवळपास लोकांची गर्दी जमा झाली होती. रामटेक पोलिसांना माहिती मिळतात त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींना पुढील उपचारासाठी दवाखान्यामध्ये तर मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठविले तसेच आरोपीला अटक करण्यात आली.

चिनी मातीचे प्लेट्स विकणाऱ्या भोसले परिवारात शोककळा

चिनी मातीच्या प्लेट विकणे व त्यातून आपला संसारगाडा चालवणे यासाठी भोसले परिवार अकोला जिल्ह्यातील अमानजपुर येथुन रामटेक ला आला होता दरम्यान आज दिनांक एकोणवीस ऑक्टोंबर ला दुपारी एक वाजताच्या दरम्यान लखन हा राखी तलाव चौक येथे झाडाखाली उभा असलेल्या पाणीपुरी हात ठेल्यावर पाणीपुरी खात होता दरम्यान याच वेळी गोंदिया कडून येणाऱ्या भरधाव अनियंत्रित कार च्या धडकेत त्याचा जीव गेला. घटनेने भोसले परिवारात शोककळा पसरली आहे.

गतिरोधक अभावी अपघातात वाढ

राखी तलाव चौक हा अतिशय वर्दळीचा चौक आहे. शहराच्या बाहेरून काढलेल्या या बायपास रस्त्यावर बसस्थानक चौकापासून तर थेट उपजिल्हा रुग्णालयापर्यंत एकही गतिरोधक ( स्पीड ब्रेकर ) नाही त्यामुळे मनसर कडून गोंदियाकडे तथा गोंदिया कडून मनसर नागपुर कडे जाणारी वाहने हे अतिशय वेगाने धावत असतात.

त्यातल्या त्यात उल्लेखनीय बाब अशी की राखी तलाव चौकात शहरापासून मानापुर कडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूने गतिरोधक देण्यात आलेले आहेत मात्र याच चौकात बायपास रस्त्यावर एकही गतिरोधक देण्यात आलेला नसल्यामुळे वाहने सुसाट वेगाने धावतात तेव्हा नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन हा चौक पार करावा लागतो. गतिरोधक अभावी येथे अपघातात वाढ झालेली आहे. तेव्हा या बायपास रस्त्यावर राखी तलाव चौकामध्ये गतिरोधक देण्याची मागणी होत आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: