स्वातंत्र्य काळापासून सतत मागणीवर दुर्लक्ष…
जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी अकोला यांना दिले निवेदन…
अकोला :- बाळापूर विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या सोनाळा येथील ग्रामस्थांनी नोव्हेंबर मध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून त्या संदर्भात जिल्हाधिकारी अकोला यांना दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी निवेदन दिले आहे.
बाळापुर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या सोनाळा गावा जवळून वाहत असलेल्या मोर्णा नदीच्या पुलाची उंची अत्यंत कमी आहे यामुळे या गावातील त्याचबरोबर या मार्गावर इतर जी गावे आहेत त्या गावातील प्रवाशांना पावसाळ्यातील चार महिन्यात जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागतो तसेच सोनाळा गावातील विद्यार्थी हे वर्ग पाचवी च्या पुढे शिक्षण घेण्यासाठी अंदूरा या गावात पायदळ व सायकलने येणे जाणे करतात त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात थोडाफार पाऊस आल्यास नदीचे पाणी या पुलावरून वाहते आणि शालेय विद्यार्थ्यांना अनेक वेळा अंडुरा येथेच रात्रभर थांबावे लागते किंवा आई-वडिलांना जीव धोक्यात घालून आपल्या मुलांना पुराच्या पाण्यातून गावात आणावे लागते पावसाळ्याच्या दिवसात शेतातील माल हा अनेक शेतकऱ्यांना शेतातच ठेवावा लागतो या पूलाची उंची वाढवावी यासाठी गावकऱ्यांनी अनेक वेळा शासन दरबारी निवेदने दिले असून कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा राजकीय नेत्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा गाव खेड्यातील नागरिकांना चांगले रस्ते मिळत नाही हे मोठे दुर्दैव आहे.
गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती ही नदीच्या पलीकडे आहे तसेच गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांना पावसाळ्याच्या दिवसात मोठा त्रास सहन करावा लागतो त्या पुलाची उंची वाढविण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी स्वातंत्र्य काळापासून विविध पक्षातील अनेक पदाधिकारी अधिकारी यांना अनेकदा निवेदने दिली आहेत.
परंतु सर्वच पक्षातील पदाधिकारी यांनी याची दाखल घेतली नाही. परिणामी गावातील ग्रामस्थांनी नोव्हेंबर मध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून त्या संदर्भात जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात आले त्यावर विष्णु अरबट तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, पंकज कुकडे, सारंग धर पाटील, नरेंद्र अरबट,
रघुनाथ अरबट, अरुण उगले, दिनकर उगले, राहुल उगले, ज्ञानदेव उगले, विठ्ठल अमझरे, अशोक अमझरे श्रीकृष्ण अमझरे पंकज बाजोड, कुशल जैन, रवी गावडे, श्रीकृष्ण वैराळे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
मोर्णा नदीच्या कमी उंचीच्या पुलामुळे परिसरातील अंदुरा, सोनाळा, बोरगाव, धामणा, नैराट, वैराट, गोपाल खेड, गांधी ग्राम, हातरूण, खांबोरा, लोणाग्रा, आगर आदी गावांना येणारी व जाणारी वाहतुक पावसाळय़ात नेहमीच बंद असते परिणामी येथील ग्रामस्थांना अव्वाच्या सव्वा भाडे देऊन प्रवास करावा लागतो विनंती अर्ज झाले आता मतदानावर बहिष्कार हा शेवटचा प्रयत्न गावकऱ्यांनी ठरविला आहे विष्णू अरबट तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी बाळापूर.