सिनस्टार विजय गोखले नटश्रेष्ठ निळू फुले सिनेभूषण पुरस्काराने सन्मानित…
अमरावती – लोकं हसणं विसरले आहेत. गंभीरतेने जगणारी माणसं आज पाहायला मिळतात; मात्र रंगभूमीवर अभिनयाच्या माध्यमातून रसिकांच्या मनावरील तणाव दूर करणारे कलावंत मात्र दुर्लक्षित राहत आहेत. कलावंत हा समाजाचा आरसा असून, कलावंत जगला तरच समाज टिकेल, असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी येथे केले.
विद्याभारती महाविद्यालयात नटश्रेष्ठ निळू फुले आर्ट फाउंडेशन, अकोलातर्फे शनिवारी आयोजित नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. सिनेस्टार विजय गोखले हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते.
यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष नरेश गडेकर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रादेशिक कला विभागाचे प्रमुख भोजराज चौधरी, रंग मुद्रा थिएटरचे दिगंबर आमले, अमरावतीचे ज्येष्ठ नाट्यकर्मी गजानन संगेकर, भारती विद्यापीठ शैक्षणिक मंडळाच्या उपाध्यक्ष मिताली राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवस्तुती व नांदीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रारंभी सिनेस्टार विजय गोखले यांना नटश्रेष्ठ निळू फुले सिने भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविकाद्वारे ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. रमेश थोरात यांनी केले.
कला ही समाजाला नवी दिशा देणारी असावी, त्यासाठी नवोदितांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन संजीवनी पुरोहित यांनी केले. संदेश वाचन ॲड. नितीन धूत यांनी केले. आभार सुधाकर गीते यांनी मानले.
निळू फुले यांनी सामाजिक बांधिलकी जपली – गोखले
पुरस्कार म्हणजे टोचणी असते. कर्तव्य पार पाडण्याची ती सदैव आठवण करून देते. मला मिळालेल्या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली आहे, असे सांगून डोक्यात हवा न जाऊ देता प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा चेहरा म्हणजे नटश्रेष्ठ निळू फुले होय. त्यांनी अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी जपली. त्याच ध्येयाने नटस्रेष्ठ निळू फुले आर्ट फाउंडेशन कार्य करीत असल्याचे गौरवोदगार सिनेस्टार विजय गोखले यांनी केले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
क्षितिज सामाजिक संस्था, सेलू बाजार जि. वाशिम (समाजभूषण), जय भवानी व्यायाम शाळा शिवापूर जि. अकोला (समाज गौरव), कमलदेवी तेजू फाउंडेशन, यवतमाळ (समाजसेवा), अमरावतीचे प्रा. एम. टी. नाना देशमुख (नाट्य तपस्वी), हिम्मतराव ढाळे गुरुजी जिल्हा परिषद शिक्षक शाळा, बोडखा जि. अकोला (समाज वैभव),
विजय ढोरे मुंडगाव जि. अकोला (सेवाव्रती) ज्येष्ठ संगीतकार दिलीप रोकडे, वर्धा (कला भूषण), वर्षा शुक्ला-गुप्ते वडसा देसाईगंज जि. गडचिरोली (नाट्य चेतना), नाट्य, चित्रपट, दूरचित्रवाणी कलावंत रूपाली कोंडेवार-मोरे, नागपूर (लक्षवेधी अभिनेत्री), प्रा. पुंडलिकराव भामोदे, अकोला (रंगयोगी) आदिंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.