Saturday, November 23, 2024
Homeराज्यमौल्यवान वृक्षांची कत्तल सुरुच..! कमलापूर वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीची नासधूस...

मौल्यवान वृक्षांची कत्तल सुरुच..! कमलापूर वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीची नासधूस…

वरिष्ठ वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

गडचिरोली ब्युरो.

सिरोंचा वनविभागांतर्गत येत असलेल्या जंगलात मागील अनेक महिन्यांपासून अवैध वृक्षतोड करुन मौल्यवान वनसंपत्तीच प्रचंड हानी करण्याचे प्रकार सुरु आहेत. यासंदर्भात अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी करुनही यावर ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे वन्यप्रेमींकडून नाराजीचा सुरु उमटत असतांनाच कमलापूर वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या 30 ते 40 हेक्टरमधील जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकारामुळे वरिष्ठ वनाधिका-यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सिरोंचा वनविभागांतर्गत एकूण आठ वनपरिक्षेत्र कार्यालय येतात. या वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या जंगल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मौल्यवान असे सागवान आहे.

त्यामुळे तस्करांनी याच उपवन क्षेत्राकडे नजरा वळवून मागील दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौणखनिज उत्खनन, वाहतूक तसेच मौल्यवान वृक्षतोड करुन परराज्यात तस्करी सुरु केली आहे. यापूर्वी तेलंगणातील राज्यातील वनकर्मचा-यांनी धाडसी कारवाई करीत महाराष्ट्र राज्यातून आलेले सागवानाची तस्करी करणा-यांचे मुसक्या आवळल्या होत्या.

सखोल चौकशीअंती सदर सागवान सिरोंचा वनविभागांतर्गत तस्करी केल्या जात असल्याचे स्पष्ट झाले होते. तेलंगणातील वनविभागाने सिरोंचातून सागवनाची तस्करी होत असल्याची स्पष्ट भूमिका मांडल्यानंतरही सिरोंचा वनविभागातील वरिष्ठांकडून यासंदर्भात ‘ब्र’ सुद्धा काढला नव्हता. विशेष म्हणजे एकट्या कमलापूर वनपरिक्षेत्रात मागील वर्षी 500 ते 600 झाडांची कत्तल झाल्याचे निष्पन्न झाले होते.

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी सातत्याने मुख्य वनसंरक्षक, संबंधित विभागाचे मंत्री यांचेकडे पाठपुरावा करीत संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती. मात्र अद्यापही या प्रकरणी कुणावरही कारवाई झाली नाही. सदर प्रकरणाची शाई वाळते न वाळते पुन्हा कुमलापूर वनपरिक्षेत्रात 30 ते 40 हेक्टर क्षेत्रात 12, 13 व 14 ऑगस्टला मौल्यवान सागवन वृक्षासह शेकडो झाडांची कत्तल झाल्याचे निदर्शनास आले आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होत असतांना संबंधित वनकर्मचारी झोपेत होते का? असा प्रश्न निर्माण होत आहे. यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी कमलापूर वनपरिक्षेत्राधिकारी यांचेशी भ्रमण्ध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सातत्याने कोट्यवधी रुपये किंमतीचे मौल्यवान वृक्षांची कत्तल होत असतांना कारवाई शुन्य होत असल्याने वरिष्ठ वनाधिका-यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अन्यथा नागपूर वनभवनासमोर कार्यालयासमोर तीव्र आंदोलन
मागील दोन वर्षापासून सिरोंचा वनविभागातील वनपरिक्षेत्रात सातत्याने मौल्यवान सागवनासह गौणखनिजाची लुट सुरु आहे. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर अनेक तक्रारी, निवेदन दिल्या गेले. तसेच संबंधित विभागाच्या मंत्र्यांचेही लक्ष वेधले. मात्र कोणतीही कार्यवाही झाली नाही.

अशातच कमलापूर वनपरिक्षेत्रात पुन्हा मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल झाल्याचे उघडकीस आले आहे. यावरुन सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक यांचा बेजबाबदारपणा तस्करांच्या पथ्यावर पडतांना दिसत आहे. त्यामुळे या प्रकारास सर्वस्वी जबाबदार सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक यांचेवर निलंबनाच्या मागणीला घेऊन प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपूर वनभवनासमोर तीव्र आंदोलन उभारणार. संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते

तस्करांना वनविभागाचेच अभय?

सिरोंचा वनविभागांतर्गत येणा-या जंगलातील मौल्यवान अशा सागवानाला मोठी मागणी आहे. त्यामुळे शेजारच्या राज्यातील तस्करांच्या नेहमीच या वनविभागाकडे नजरा लागू असतात. त्यामुळे तस्करांची टोळी या भागात नेहमीच सक्रिय असते. काही महिन्यांपूर्वी तेलंगणा राज्य वनविभागाने तस्करांच्या मुसक्या आवळल्या असता सागवान तस्करीचे जाळे सिरोंचाशी जुळले असल्याचे स्पष्ट झाले होते.

तेलंगणा वनविभागाने स्पष्ट कळविल्यानंतरही सिरोंचा वनविभाग मात्र मौल्यवान सागवान तस्करीवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरले असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे या तस्करांना वनविभागाद्वारेच अभय दिले तर जात नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: