Monday, December 23, 2024
Homeराज्यअमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील साठ टक्के वीज ग्राहक करतात डिजीटल पेमेंट...

अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील साठ टक्के वीज ग्राहक करतात डिजीटल पेमेंट…

लघुदाब वर्गवारीतील घरगुती,वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकाचा यात समावेश डिजीटल पेमेंटसाठी ०.२५ टक्के, प्रॉम्प्ट पेमेंटसाठी एक टक्का, तर गो ग्रीन साठी प्रती बिल दहा रूपयाची सवलत

अमरावती – महावितरण अमरावती परिमंडला अंतर्गत अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील साठ टक्के महावितरणचे ग्राहक वीज बील भरण्यासाठी डिजीटल व्यवहार करतात. त्यामुळे त्यांना बिल रकमेच्या ०.२५ टक्के (जास्तीत जास्त रु. ५००/-) इतकी सवलत देखील देण्यात आलेली आहे. परिमंडलात डिजीटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ऑगष्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात ९८ हजार ३३४ ग्राहकांची त्यात वाढ झाली आहे.

डिजीटल इंडीया इनिशिएटीव्हचा भाग म्हणून महावितरणच्या ग्राहकांना ऑनलाईन वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.शिवाय मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आणि वरिष्ठ व्यवस्थापक विजय पचारे आणि सर्व विभागीय कार्यकारी अभियंते यांच्या पुढाकाराने ग्राहकांना डिजीटल पेमेंट करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.जुलै महिन्यात ३ लाख ३ हजार ५८३ ग्राहक विजेचे बिल डिजीटल पेमेंटने करत होते.

त्यांनतर ऑगष्टमध्ये यात ३१ हजार ७९१ ग्राहकांची वाढ झाल्यानंतर ग्राहकसंख्या झाली ३ लाख ३५ हजार २०२. सप्टेंबर महिन्यात या संख्येत ९८ हजार ३३४ ने वाढ झाल्यानंतर परिमंडलात डिजीटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संख्या ४ लाख ३३ हजार ५३६ वर पोहचली.त्यामुळे सध्यास्थितीत लघुदाब वर्गवारीतील घरगुती,वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीत वीज बिल भरणाऱ्या ग्राहकापैकी ६० टक्के ग्राहक डिजीटल पध्दतीने पेमेंट करतात.

महावितरणच्या वतीने वीजग्राहकांना mahadiscom या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाईन पध्दतीने विनामर्यादा विजदेयकाचा भरणा करता येवू शकतो. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पध्दतीत ग्राहक वीजदेयकाचा भरणा क्रेडिट/डेबिटकार्ड, नेटबँकींग व युपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत करू शकतो. तसेच भारत बिल पेमेंट (BBPS) मार्फत देखील वीज बिल भरणा करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त महावितरणने रु.५,०००/- पेक्षा जास्त बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना RTGS/NEFT द्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

डिजीटल पेमेंटसाठी ०.२५ टक्के ,प्रॉम्प्ट पेमेंटसाठी एक टक्का,तर गो ग्रीन साठी प्रती बिल दहा रूपयाची सवलत; वीज ग्राहकांना डिजीटल पेमंटसाठी प्रोत्साहन म्हणून त्यांना एकुण बिल रकमेच्या ०.२५ टक्के (जास्तीत जास्त रु. ५००/-) इतकी सवलत देखील देण्यात येते. तसेच बिल जनरेट झाल्यानंतर सात दिवसाच्या आत वीज बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांना एक टक्का एवढे प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काऊंट देण्यात येते.याशिवाय पर्यावरण स्नेही गो ग्रीन सवलत घेणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक बिलात १० रूपयाची सवलत देण्यात येते.

२.५ लाख ग्राहकांना महावितरणची VAN (व्हर्च्युअल अकाऊंट सेवा) – परिमंडलातील २.५ लाख मोठ्या ग्राहकांना ऑनलाईन पेमेंटसाठी महावितरणच्या मुख्य कार्यालयाकडून VAN सेवा उपलब्ध करून दिलेली आहे.सध्यास्थितीत या सेवेचा लाभ परिमंडलातील १ लाख १० हजार ग्राहक घेत आहे.

सुरक्षित ऑनलाइन पेमेंट :

• RBI च्या पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम कायदा, २००७ अंतर्गत शासित.

• माहिती तंत्रज्ञानच्या डेटा सुरक्षा मानकांचे पालन केले जाते

• व्यवहार अयशस्वी झाल्यास, ३ दिवसांच्या आत स्वयं परतावा मिळेल.

शंका/तक्रार/ माहितीसाठी:

• आम्हाला मेल करा: [email protected]

• आमच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा: 1912, 1800-233-3435, 1800-212-3435,022-69852752

• महावितरण संकेतस्थळ किंवा मोबाईल ऍप मार्फत तक्रार नोंदवा

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: