Friday, July 12, 2024
spot_img
Homeराज्यजरांगे पाटलांनी फडणवीसांवर लावलेल्या आरोपांची SIT चौकशी करा - नाना पटोले...

जरांगे पाटलांनी फडणवीसांवर लावलेल्या आरोपांची SIT चौकशी करा – नाना पटोले…

सरकार दिवाळखोरीत निघाल्यानेच सातत्याने पुरवणी मागण्या.

जनतेच्या घामाच्या एका-एका पैशाचा हिशोब सरकारने द्यावा.

साखर कारखान्यांना पैसे देता मग शेतकऱ्यांना मदत का देत नाही?

मुंबई, दि. २७ फेब्रुवारी मराठा समाजाच्या आरक्षणावरुन सरकारने राज्यात वाद निर्माण केले आहेत, सरकारच समाजा-समाजात तेढ निर्माण करत आहे. मराठा समाजावरून राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण बिघडलेले आहे. मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काय बोलणे झाले हे जाहीर करण्याची मागणी काँग्रेस सातत्याने करत आहे.

आता मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांची एसआयटी मार्फत चर्चा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सरकारने आधी ७५ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या होत्या त्यानंतर ४० हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आल्या आणि आता ८ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या आहेत.

राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडलेली असते, दिवाळखोरी निघालेली असते त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवण्या मागण्या सादर केल्या जातात. या मागण्या कशासाठी आणल्या आहेत? आधीच्या पुरवणी मागण्यांच्या पैशांचे काय झाले? सरकारने २०० कोटी रुपये साखर कारखान्यांना दिले त्यानंतर पुन्हा ५०० कोटी साखर कारखान्यांना दिले.

जनतेचे पैसे साखर कारखान्यांना दिले जात आहेत मग शेतकऱ्यांच्या वाट्याला किती पैसे गेले? किती शेतकऱ्यांना लाभ दिला,याची माहिती सरकारने दिली पाहिजे. पैसे कुठे गेले हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे, हा पैसा त्यांच्या घामाचा आहे. सरकारकडे पैसे नसल्याने कर्ज काढून सरकार चालवले जात आहे हे जनतेला सांगा व जनतेची माफी मागा.

विदर्भ मराठवाड्यासह काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, सर्वे कशाचा करता, तातडीने मदत करा. अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत द्या फक्त कारखानदारांचे खिसे भरु नका. रोज ८ शेतकरी आत्महत्या म्हणजे एका वर्षात २५०० शेतकरी आत्महत्या होत आहेत.

२०१३-१८ दरम्यान मराठी शेतकऱ्यांच्या २८ टक्के आत्महत्या झाल्या तर २०१९ ते २०२४ मध्ये त्या ९४ टक्के झाल्या आहेत. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. जगणे कठीण झाल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हणून पुरवण्या मागण्यात ते मंजूर करून घेतले पण शेतकऱ्यांन ते पैसे मिळाले नाहीत. पुरवणी मागण्यातून घेतलेल्या एका एका पैशाचा हिशोब सरकारला द्यावा लागेल.

सरकार तरुणांच्या भविष्याशी खेळत आहे. नोकर भरती करत नाही, तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाला पण सरकार पुरावा मागत आहे, परिक्षांमध्ये कॉपी घोटाळा झाला, पेपर फुटले, अधिकारीच कॉपी पुरवत होतो हेही उघड झाले आहे. सरकार क़ॉपीबाज झाले आहे का? हा राजकारणाचा विषय नाही तर आम्ही जनभावना मांडत आहोत आणि सरकारला त्याचे उत्तर द्यावे लागेल, असे नाना पटोले म्हणाले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: