मुंबई – गेल्या आठ दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांनी गायन आणि संगीताच्या माध्यमातून कला क्षेत्राची सेवा बजावली आहे. या कुटुंबातील एक घटक असलेल्या आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करताना आनंद होत आहे. आशाताई भोसले या महाराष्ट्राची शान आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आज सायंकाळी गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना सन २०२१ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ख्यातनाम क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आशाताई भोसले यांनी आतापर्यंत विविध भाषांतून हजारो गीते गायिली. त्यांनी भक्ती संगीतापासून ते डिस्कोपर्यंतची विविध गाणी गात गीतांचा खजिना उपलब्ध करून दिला. त्यांच्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा गौरव वाढला आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे.
त्यांनी आपल्या वाटचालीत संघर्ष अनुभवताना दुसऱ्यांचा संघर्ष गीतातून आनंदी केला आहे. त्यांनी गायिलेली गीते आजही ताजीतवानी वाटतात. पुढेही ती तशीच राहतील. ही गाणी सर्वांना प्रेरणादायी ठरतील, असेही त्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आशाताई भोसले यांचा गायनाचा संगीतमय प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचे गायन बहुश्रुत आहे. हे त्यांनी विविध भाषांमधील गायिलेल्या हजारो वैविध्यपूर्ण गीतांमधून सिद्ध केले आहे. त्यांनी आपल्या गाण्यातून वैशिष्ट्य जपले आहे. त्या अष्टपैलू गायिका आहेत.
त्यांनी आपल्या गीतातून वेगळे भावविश्व निर्माण केले. त्यांनी गायिलेली गीते लहानापासून ते थोरापर्यंत प्रत्येकाला गुणगुणायला आवडतात हे त्यांच्या गायनाचे यश आहे. त्यांच्याकडून पुढेही संगीत सेवा घडो, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्राची भूमी ही रत्नांची खाण आहे. या खाणीतील दोन रत्न म्हणजे गायिका आशाताई भोसले आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर येथे उपस्थित आहेत. आशाताईंनी गायिलेल्या गीतांतून जीवनाची दिशा आणि जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते. त्यांनी गायिलेली गीते आजही सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान मिळवून आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. खारगे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराची पार्श्वभूमी सांगितली.
सत्काराला उत्तर देताना गायिका श्रीमती भोसले म्हणाल्या की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारताना आज माहेरी आल्यासारखे वाटत आहे. वडील दीनानाथ मंगेशकर, माई मंगेशकर, दीदी लता मंगेशकर यांच्या आशीर्वादाने येथपर्यंतचा प्रवास झाला आहे.
गाण्यांनी माझे जीवन समृद्ध केले असून या वाटचालीत संगीतकार आणि सह गायकांना विसरू शकत नाही. तसेच सर्व प्रकारचे संगीत आपण ऐकले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तसेच अभिनेते सुमीत राघवन यांनी त्यांची छोटेखानी मुलाखत घेतली. प्रारंभी गायिका आशाताई भोसले यांच्या जीवनावर आधारित ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यानिमित्त गायिका आशा भोसले यांच्या गीतांवर आधारित ‘आवाज चांदण्याचे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात आशा भोसले यांनी गायलेली विविध गीते सादर करीत उपस्थितीतांना मंत्रमुग्ध केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर, अभिनेता सुमीत राघवन यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी लोकप्रतिनिधी, मराठी व हिंदी चित्रपसृष्टीतील कलावंत, गायक, वरिष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित हो