येत्या दहा दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
महेंद्र गायकवाड
नांदेड
नांदेड जिल्ह्याला विविध तीर्थक्षेत्राची स्थळे लाभली असून यातील पावित्र्य जपत त्या-त्या तीर्थस्थळांच्या विश्वस्तांसमवेत चर्चा करुन केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेंतर्गत विकास केला जात आहे. जिल्ह्यातील तब्बल 26 तीर्थक्षेत्रांवरील विविध विकास कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करुन येत्या 10 दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश खासदार प्रताप चिखलीकर यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांनी टप्पा 1 प्रणालीमध्ये सुचविल्याप्रमाणे सुमारे 26 कामे प्रस्तावित केले आहेत. या कामांबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, रोहीत तोंदले, सर्व तालुक्यांचे उपअभियंता याबैठकीस उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात राहेर येथील नृसिंह मंदिरापासून माहूरच्या दत्त शिखर संस्थानापर्यंत प्रत्येक तालुक्यात विविध ठिकाणे असलेल्या तीर्थस्थळांवर नागरिकांची मोठी श्रध्दा आहे. कंधार तालुक्यातील बोरी (बु.) येथे लोअर मनार प्रकल्पाच्या जलाशयाच्या काठावर असलेले महादेव मंदिर व धरणाच्या पाण्यात साकारलेले बेट हे पर्यटनाच्या मोठ्या प्रमाणात संधी घेऊन उभे असल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांगितले. होट्टल येथील सिध्देश्वर मंदिर व परिसर, कोलंबी येथील 108 दत्त संस्थान प्रतिष्ठाण, गोरठा येथील श्री. संत दासगणु महाराज आदि विविध तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे.
या प्रत्येक संस्थानातील तीन कोटी रुपयांपर्यंतच्या विकास कामांचा आराखडा येत्या दहा दिवसात सादर केल्यावर त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल. याचबरोबर जिल्ह्यातील काही तीर्थस्थळांना लागणारा निधी हा अधिक आहे. निधीच्या उपलब्धतेप्रमाणे जे काम अतिशय अत्यावश्यक आहे ती कामे व त्याच्या प्रस्तावावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्ह्यातील अनेक भागातील संस्थानावर भाविकांच्या श्रध्दा आहेत. नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथे साईबाबा संस्थान, कंधार तालुक्यातील गुंडा येथे नागबर्डी (नागदेवता) संस्थान पर्यटनासह पर्यावरणाच्या दृष्टीनेही लाखमोलाचे आहे. याठिकाणी कोणत्याही वृक्षाचे साधे पानही तोडल्या जात नाहीत. लिंबाची असंख्य झाडी हे या स्थळांचे वैशिष्ट्य आहे. लोकांच्या श्रध्देसह पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्वाच्या असलेल्या अशा विचारांनाही आपण चालना दिल्या पाहिजेत, असे खासदार चिखलीकर यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी डॉ. खुशालसिंह परदेशी यांनी हे काम अधिक पुर्ण होण्याच्या दृष्टीने संबंधित विभाग प्रमुखांना यावर तात्काळ कार्यवाही करुन वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे सूचना दिल्या.