अमरावती/मुंबई, दि. २३ऑगस्ट २०२२:- ऊर्जा खात्यातील प्रदीर्घ अनुभव असलेले श्री विश्वास पाठक यांची महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनी अंतर्गत असलेल्या महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांवर स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक झाली आहे.
मुंबई येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीच्या मुख्यालयात श्री पाठक यांनी आज पदभार स्वीकारला. त्यांनी यापूर्वी २०१५ ते २०२० या कार्यकाळात याच पदाचा पदभार सांभाळला असून या काळात त्यांनी वीज निर्मितीची स्थापित क्षमतावाढ, भारनियमन मुक्त महाराष्ट्र यात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांनी ऊर्जा विभागाला एका विशिष्ट उंचीवर नेण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे.
२०१४-२०१९ या युती सरकारच्या काळात मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ऊर्जा विभागासाठी त्यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. तसेच त्या कार्यकाळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत प्रत्येक जिल्हास्थानी ऊर्जा विभागाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचाव्या म्हणून पत्रपरिषदा घेऊन पत्रकारांशी संवाद साधला आहे. यामुळे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच पत्रकारांशी त्यांचा जनसंपर्क आहे. विविध वर्तमानपत्रांमध्ये आतापर्यंत त्यांचे चारशेवर लेख प्रसिध्द झाले आहेत.
श्री. पाठक हे वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवीधर आहेत आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे फेलो सदस्य तसेच कायद्यातील पदवीधर आहेत. त्यांना कायदा, व्यवस्थापन, वित्त, कॉर्पोरेट कायदा आणि उद्योग क्षेत्रातील २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी कॉर्पोरेट कायद्यात मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणूनही सराव केला आहे. श्री. पाठक हे स्वतंत्र संचालक म्हणून विविध सूचीबद्ध आणि असूचीबद्ध कंपन्यांच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत. महाराष्ट्रासाठी व्हिजन डॉक्युमेंट कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा देखील त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे.